https://images.loksatta.com/2020/05/tempreture-1.jpg?w=830

राज्यात अंगाची लाहीलाही..

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट

by

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट

पुणे : कोरडय़ा हवामानाची स्थिती आणि मध्य भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानवाढ होऊन राज्यात सध्या लाहीलाही निर्माण होत आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी सध्या उष्णतेची लाट आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. नागपूर येथे राज्यातील उच्चांकी ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

ढगाळ वातावरणाची स्थिती दूर होऊन गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्याच्या सर्वच भागांमध्ये निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान निर्माण झाले आहे. त्यातच राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंत उष्णतेची लाट निर्माण झाली. गेल्या तीन दिवसांपासून या भागातून कमी उंचीवरून उष्ण वारे राज्याकडे येत आहेत. परिणामी राज्याच्या दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. सध्या विदर्भातील बहुतांश भागात उष्णतेची तीव्र लाट आल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. या भागातील तापमान सरासरीच्या तुलनेत ४ अंश सेल्सिअसने वाढले आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भात अंगाची लाहीलाही करणारे ऊन जाणवते आहे. मराठवाडय़ातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. परभणी, नांदेड येथे सर्वाधिक चटका जाणवतो आहे. औरंगाबाद येथे रात्रीच्या तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ४.८ अंशांनी वाढल्याने तेथे रात्री कमालीचा उकाडा आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, जळगाव येथील तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, पुणे, सांगली, सातारा या भागातील उन्हाची तीव्रताही वाढली आहे. कोकण विभागातील मुंबईसह सर्वच ठिकाणचा तापमानाचा पारा सरासरीच्या जवळपास आहे. कोकणात काही ठिकाणी २८ मे रोजी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राजस्थाननंतर विदर्भातील चटका तीव्र : विदर्भात सध्या राजस्थानप्रमाणेच तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ होऊन ते ४६ ते ४७ अंश सेल्सिअसच्या आसपास गेले आहे. नागपूर आणि चंद्रपूर या भागांतील तापमानाचा पारा ४७ अंशांच्याही पुढे पोहोचण्याची चिन्हे आहेत. २५ मे रोजी या भागात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.