मागणीनुसार गाडय़ा देण्याची रेल्वेमंत्र्यांची तयारी
सोमवारपासून गरजेनुसार रेल्वेगाडय़ा मिळतील, अशी हमी दिली.
by लोकसत्ता टीममुंबई : स्थलांतरित मजूर, कामगारांना परराज्यांमधील मूळ गावी पाठविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष रेल्वेगाडय़ा कमी उपलब्ध होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करताच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारपासून हव्या तेवढय़ा रेल्वेगाडय़ा देतो, असे ट्विटरवरून जाहीर करून चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात तटविला.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे केलेल्या भाषणात रेल्वेमंत्रालयाकडून अतिशय कमी विशेष रेल्वेगाडय़ा उपलब्ध होत असल्याचा तक्रारीचा सूर लावला होता. लाखो मजुरांना मूळ गावी जायचे आहे, राज्य सरकारच्या यंत्रणेकडे त्यांच्या याद्या तयार असल्याचे त्यांनी म्हटले होते. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी १२५ विशेष रेल्वेगाडय़ा उपलब्ध करून देत असून मजुरांची यादी, वैद्यकीय प्रमाणपत्रे, रेल्वेगाडी कुठून व कोणत्या स्थानकापर्यंत हवी आहे, आदी तपशील एक तासात रेल्वे महाव्यवस्थापकांकडे पाठवावा, अशी विनंती केली. त्याचबरोबर सोमवारपासून गरजेनुसार रेल्वेगाडय़ा मिळतील, अशी हमी दिली.
आमचा संघर्ष सुरूच राहील : फडणवीस
मुंबई : कानावरचे राजकीय पडदे काढायचे की नाही, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. ‘आमचा संघर्ष आणि आवाज असाच सुरू च राहील’, असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. स्वत:चे अपयश लपविण्यासाठी वारंवार केंद्रावर खापर फोडणे, याला काय म्हणायचे? केंद्र सरकार आजही सर्व ती मदत देण्यास तत्पर आहे, असे फडणवीस म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.