माजी शरीरसौष्ठवपटू सत्यवान कदम कालवश
तरुण पिढीला तंदुरुस्तीचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देत भाईंनी शरीरसौष्ठवाची चळवळ उभारली.
by लोकसत्ता टीममुंबई : अनेक शरीरसौष्ठवपटू घडविणारे तसेच मुंबई आणि महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवाचे खरे राजदूत समजले जाणारे सत्यवान (भाई) कदम यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
शरीरसौष्ठव खेळाचा प्रचार, प्रसार आणि प्रगतीसाठी स्वत:चे आयुष्य वाहून घेणारे भाई कदम हे पीळदार देहयष्टीचे शरीरसौष्ठवपटू होते. अनेक राष्ट्रीय स्पर्धामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले. ६०च्या दशकात त्यांनी ‘भारत-श्री’चा बहुमान पटकावला होता.
१९७१ साली दादर कबुतरखान्याशेजारी सुरू के लेल्या मातृछाया व्यायामशाळेतून त्यांनी अनेक चांगले शरीरसौष्ठवपटू देशाला दिले. मधुकर थोरात, शाम रहाटे, विकी गोरक्ष, मोहनसिंग गुरखा, विनय दलाल, भाऊ गुजर, वॉल्टर फर्नाडिस, प्रकाश गव्हाणे, प्रवीण गणवीर यांच्यासारखे शरीरसौष्ठवपटू त्यांनी घडवले. शरीरसौष्ठव अफाट ज्ञान आणि माहिती असलेल्या भाई कदम यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक खेळाडू यायचे. ते स्वत: मार्गदर्शन शिबिरांद्वारे खेळाडूंना प्रशिक्षणही द्यायचे. अनेक शरीरसौष्ठवपटू घडविल्यामुळे त्यांना राज्य शासनाने १९९१ साली दादोजी कोंडदेव राज्य क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित के ले होते. मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष असलेल्या भाईंच्या नेतृत्वाखाली मुंबईत अनेक जागतिक, राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धाचे दिमाखात आयोजन करण्यात आले होते.
तरुण पिढीला तंदुरुस्तीचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देत भाईंनी शरीरसौष्ठवाची चळवळ उभारली. त्यामुळे मुंबईत मोठय़ा संख्येने व्यायामशाळा उभ्या राहू लागल्या. शरीरसौष्ठव या खेळात आपल्या कार्याने दरारा निर्माण करणाऱ्या भाई यांचा शब्द अंतिम मानला जायचा. सत्यवान कदम यांच्या जाण्याने मुंबई शरीरसौष्ठवाची अपरिमित हानी झाल्याची प्रतिक्रिया भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी व्यक्त के ली. भाईंच्या निधनाने शरीरसौष्ठवात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी श्रद्धांजली वाहिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.