https://images.loksatta.com/2020/05/spt02-4.jpg?w=830

अर्थव्यवस्था कोलमडल्याचा फटका खेळाडूंना जाणवू देणार नाही!

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची कामगिरी सध्या उत्तम होत आहे

by

आठवडय़ाची मुलाखत : दिलीप तिर्की, भारताचे माजी ऑलिम्पियन हॉकीपटू

तुषार वैती, लोकसत्ता

मुंबई : सध्या करोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली असून भारतातही सारखीच स्थिती आहे. अर्थव्यवस्था बिघडल्याचा फटका आगामी काळात भारतीय क्रीडाक्षेत्राला बसू शकतो. पण ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी केंद्र सरकार खेळाडूंना कोणत्याही अडचणी जाणवू देणार नाही, असा विश्वास पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या दिलीप तिर्कीने व्यक्त केला.

भारतीय पुरुष हॉकी संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर भल्याभल्या संघांना टक्कर देत आहे. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची कामगिरी सध्या उत्तम होत आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय संघ ऑलिम्पिकची कसून तयारी करत आहे. ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्ससारख्या बलाढय़ संघांना हरवण्याची क्षमता असलेल्या भारतीय हॉकी संघाकडून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा बाळगता येईल, असे मत तीन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा माजी हॉकीपटू तिर्की याने व्यक्त केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्याच्याशी केलेली ही बातचीत-

* करोनानंतरची देशातील खेळांची स्थिती कशी असेल?

संपूर्ण जगात सध्या करोनाने हाहाकार माजवला आहे. मात्र योग्य वेळी सरकारने टाळेबंदीची घोषणा केल्यामुळे आपण बऱ्यापैकी सुरक्षित आहोत, अशी भावना आहे. अन्य देशांमध्ये मात्र करोनामुळे वाईट स्थिती आहे. खेळांच्या बाबतीत बोलायचे झाले तर ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षांने लांबणीवर पडल्यामुळे खेळाडूंना तयारीसाठी खूप वेळ मिळाला आहे. या वेळेचा सदुपयोग केल्यास, खेळाडूंना आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचता येईल. मात्र ज्यांची ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा आहे, त्यांच्यासाठी मात्र ही दु:खद घटना असेल. पुढील वर्षी आपण ऑलिम्पिकमध्ये खेळू की नाही, अशी चिंता काही खेळाडूंना सतावू लागली आहे. पण सर्व देशांतील खेळाडूंसाठी ही सारखीच स्थिती असल्यामुळे फारशी चिंता करण्याचे कारण नाही. आता केंद्र सरकारने खेळाडूंना सरावासाठी परवानगी दिल्यामुळे सर्व जणांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. टाळेबंदीदरम्यान काही जणांना दुखापतीतून बरे होण्याची संधी मिळाली. दोन महिने खेळाडूंना चांगली विश्रांती मिळाली असून आता नव्या दमाने ते मैदानावर उतरतील, असा विश्वास आहे.

* लांबणीवर पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिकच्या आयोजनासंबंधीही अद्याप प्रश्नचिन्ह आहे, याविषयी काय सांगशील?

ऑलिम्पिक लांबणीवर पडल्याने ज्या खेळाडूंना पात्र ठरता आले नाही, त्यांना संधी मिळाली आहे. पण जे उत्तम तयारीत आहे, त्यांचे मनोबल काहीसे खचले आहे. करोनाचे अस्तित्वच या जगात राहू नये, अशी माझी मनोमन इच्छा आहे. पण करोना संपूर्णपणे नष्ट होणार नाही, ही सद्य:परिस्थिती स्वीकारूनच पुढे वाटचाल करावी लागणार आहे. पुढील वर्षीही ऑलिम्पिक स्पर्धा होईल की नाही, याविषयी साशंकता असली तरी जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) कोणत्याही परिस्थितीत ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन करून दाखवतील, असा विश्वास आहे. ऑलिम्पिकच्या आयोजनाचे चित्र अद्याप स्पष्ट न होऊ शकल्यामुळे खेळाडू दडपणात असतील, हे मात्र नक्की. सामाजिक अंतराचे भान ठेवून त्यांचा टाळेबंदीतही सराव सुरू असेल, याची मला खात्री आहे.

* देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्याचा फटका क्रीडाक्षेत्राला बसेल का, याबाबत खासदार म्हणून काय सांगशील?

संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असताना भारतात मात्र काहीसे सकारात्मक चित्र आहे. देशाचे आणि राज्यांचे करोनामुळे आर्थिक नुकसान झाल्यामुळे केंद्र सरकारने सध्या लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून क्रीडाक्षेत्राला मिळणाऱ्या निधीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. पण पुढील वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा असल्याने ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना त्याचा कोणताही फटका बसणार नाही, असा विश्वास आहे. त्याचबरोबर क्रीडामंत्री किरेन रिजिजू हे स्वत: क्रीडाप्रेमी असल्यामुळे खेळाडूंना कोणत्याही प्रकारे आर्थिक फटका बसणार नाही, याची काळजी ते घेतील, अशी खात्री आहे.

* भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाच्या ऑलिम्पिक तयारीबाबत काय सांगाल?

भारताचे दोन्ही संघ सध्या चांगली कामगिरी करत आहेत. तंदुरुस्तीच्या बाबतीत सरस असल्यामुळे ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धाची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. मनप्रीत सिंग संघाचे नेतृत्व उत्तमप्रकारे सांभाळत असून रुपिंदरपाल सिंग, अमित रोहिदास, एस. पी. सुनील, आकाशदीप या अनुभवी खेळाडूंच्या साथीने बिरेंद्र लाकरा, हरमनप्रीत सिंग हे खेळाडूही आपला जलवा दाखवत आहेत. महिला संघाच्या कामगिरीचा आलेख उंचावत असून राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची योग्य वाटचाल सुरू आहे. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांकडून नक्कीच पदकाची अपेक्षा बाळगता येईल.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.