थेंबे थेंबे तळे साचे : व्यवस्थापन करोना काळातील..
काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर काही कमी पगारावर काम करत आहेत.
by लोकसत्ता टीमतृप्ती राणे
हीच वेळ आहे सावध होण्याची. आपल्या मनातील भीतीचा वापर करून आपल्याला भुलविण्याचे प्रयत्न केले जातील. तेव्हा खबरदार व्हा!
अस्थिर (व्होलेटाइल), अनिश्चित (अनसर्टन), जटिल (कॉम्प्लेक्स) आणि संदिग्ध (अॅम्बिग्युअस) अशी सारांशात ‘व्हुका’ अवस्था आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीला जर काही म्हणता येत असेल तर ते म्हणजे व्हुका वर्ल्ड! नक्की काय चाललंय, यातून पुढे काय होणार, किती काळ हे सगळं चालणार, हे कधी बदलणार, यातून सर्व कसे बाहेर येणार आणि आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं होणार की नवीन काही तरी सुरू होणार? असे सगळे प्रश्न सर्वाच्या मनात वादळ निर्माण करत आहेत. गेले दोन महिने आपल्यातले बरेच जण घरात आहेत. जमेल तसं काम करत आहेत, मुलं नवीन पद्धतीने शिकत आहेत, वयस्कर मंडळीसुद्धा जमेल तितका हातभार घरातील कामाला लावत आहेत! कदाचित आयुष्यात इतका काळ कधीही कुणीही दिवसाचे चोवीस तास आणि आठवडय़ाचे सातही दिवस कदाचित एकत्र घालवले नसतील. सगळेच जण कधी लॉकडाऊन संपून पुन्हा आयुष्य पूर्ववत होतंय याची वाट पाहात आहेत.
परंतु आपल्यातील काही मंडळी कदाचित आयुष्य पुन्हा उभारण्यासाठी संधी शोधत आहेत. काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर काही कमी पगारावर काम करत आहेत. काहींचे उद्योग पूर्णपणे बंद असल्यामुळे उत्पन्न शून्य झालेलं आहे. काही जणांना तर कर्जफेडीची चिंता सतावत आहे. आपापल्या गावी परत गेलेले मजूर पुन्हा कधी येणार आणि काम सुरळीत कधी सुरू होणार याबद्दलसुद्धा व्यावसायिकांच्या मनात भरपूर मोठा प्रश्न आहेच. तेव्हा प्रत्येकाने या सगळ्या शंकांसाठी आता काही महत्त्वाची पावले उचलायला हवी आहेत. पैसे किती आहेत यापेक्षा ते गरजेला मिळतील आणि पुरतील याबाबत आपल्याला विश्वास वाटायला हवा आहे. इथे मुद्दा आता गुंतवणूक किती तोटय़ात आहे हा नसून, आपली आर्थिक परिस्थिती किती खोलात आहे हा आहे! सगळीच सुखं जरी पैशाने विकत घेता येत नसली तरीही आपल्याकडे पुरेसा पैसा आहे ही भावना आपल्याला कठीण प्रसंगांना सामोरं जायचा आत्मविश्वास देते. एका आर्थिक सल्लागारापेक्षा आज एक भावनिक मार्गदर्शक म्हणून मी तुम्हा वाचकांशी संवाद साधणार आहे.
१) हा काळ किती लांबणार आहे, हे कुणालाही ठाऊक नाही. तेव्हा पैसे हाताशी बाळगा. किमान १२ ते १८ महिन्यांचा खर्च आपल्याकडे जमा होईल याची खात्री करून घ्या. हे पैसे अतिशय सुरक्षित गुंतवणूक पर्यायात गुंतवा.
२) मागील दोन महिन्यांतील खर्चाचा आढावा घ्या. यातून आपल्या खऱ्या गरजा कळतील. तेव्हा जेवढा होईल तेवढा खर्च सांभाळून करा. टाळेबंदी उठल्यावर कदाचित थोडे खर्च वाढतील, परंतु तेसुद्धा नियंत्रणात असू द्या.
३) ज्यांच्याकडे नोकरी नसेल किंवा पगाराची अनिश्चितता असेल, त्यांनी त्यांच्या गुंतवणुकीचा आढावा घेणे जास्त गरजेचे आहे. जास्त जोखीम आणि अनिश्चित परतावे असणाऱ्या गुंतवणुकीतून पैसे काढून, सुरक्षित ठिकाणी पैसे ठेवा.
४) ज्या घरांमध्ये वयस्कर मंडळी आहेत, त्यांनी वैद्यकीय खर्चासाठी थोडी जास्त रक्कम बाजूला ठेवायला हवी. जरी लॉकडाऊन संपलं तरीही करोनाचे सावट अजून बराच काळ राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा जास्त धोका वरिष्ठ मंडळींना आहे. म्हणून औषधोपचारांचा खर्च कदाचित वाढेल.
५) करोनाच्या काळामध्ये मानसिक आजारसुद्धा फोफावले आहेत. तेव्हा घरातील मंडळींच्या मन:स्थितीकडेसुद्धा लक्ष असू द्या. काही गोष्टी काळ बदलल्यावर नक्कीच बदलतील. परंतु जिथे गरज असेल तिथे नक्कीच समुपदेशकाचा सल्ला घ्या.
६) आर्थिक अस्थैर्य याचा मानसिक अस्थैर्याशी संबंध असतो. तेव्हा सर्वप्रथम आर्थिक गुंतागुंत कशी कमी करता येईल हे बघा. सगळीकडे नुकसान होताना दिसत असेल, तरीही मार्ग शोधा. कुठे नुकसान सोसून जर हाताशी काही रक्कम मिळत असेल तरीही चालेल. कारण आजची गरज भागवणं महत्त्वाचं आहे.
७) जर तुम्ही र्कज काढलेली असतील, तर सरकारने बँकांना सहा महिन्यांसाठी वसुली थांबवायला सांगितलेली आहे. तेव्हा जमत नसेल तर या गोष्टीचा फायदा करून घेता येईल. परंतु ध्यानात असू द्या की व्याज चालू राहणार आहे. तेव्हा पुढे जास्त पैसे भरावे लागणार.
८) सरकारच्या २० लाखांच्या पॅकेजमध्ये बऱ्याच अंशी कर्जाची सोय केली गेलेली आहे. लघू आणि मध्यम उद्योगांसाठीच्या तरतुदी नीट समजून घ्या आणि जमेल तितका फायदा करून घ्या.
९) आताच्या परिस्थितीत रोकड व्यवस्थापन हे गुंतवणूक व्यवस्थापनापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. तेव्हा आपले खर्च आणि आपली मिळकत यांचा मेळ जमवून मग गरज पडेल तर कर्ज हे ध्यानात ठेवा.
१०) कर्जाचा डोंगर जर खूप मोठा झाला असेल, तर महाग कर्ज अगोदर फेडा. जमेल तेथे ओटीएस – एकरकमी तडजोडीचा पर्याय वापरा. लक्षात घ्या की,जसे तुम्हाला कर्जातून बाहेर पडायचंय तसंच समोरच्यालासुद्धा त्याचे पैसे परत मिळणे महत्त्वाचे आहे.
११) गुंतवणूक विकू की कर्ज काढू? या प्रश्नाचं उत्तर अजिबात सोपं किंवा सरळ नाही. कारण कर्ज घेण्यामागचं कारण वेगवेगळं असतं. जर एखाद्याने उद्योगासाठी कर्ज काढलं आहे, तर तिथे उद्योग पुन्हा व्यवस्थित सुरू होऊन वाढायची शक्यता जास्त असल्यास नक्की कर्जाचा आधार घेता येईल. परंतु खर्च भागवण्यासाठी किंवा मौजमजेसाठी काढलेली र्कज ही फेडलेलीच बरी.
१२) जिथे नोकरीची साशंकता वाटत असेल तिथे सर्व गुंतवणूक थांबवून पैसे बँकेत ठेवावेत. काही काळासाठी ‘एसआयपी’ बंद राहिल्याने काहीही नुकसान होणार नाही.
१३) गुंतवणूक व्यवस्थापनासाठी पुन्हा एकदा जोखीम कमी करून, हाव बाजूला ठेवून, झेपेल असेच गुंतवणूक पर्याय सांभाळा. जी गुंतवणूक धोक्याची होती, तिच्या परतफेडीची वाट बघू नका. कारण ती परत येईलच याची कोणतीही शाश्वती नाही.
१४) निवृत्त आणि पेन्शन न मिळणाऱ्यांनी त्यांच्या गुंतवणुकीतून मासिक रकमेची सोय करताना फक्त आताच्या परिस्थितीचा विचार न करता पुढच्या काळाचासुद्धा विचार करणं आवश्यक आहे. शेअर बाजार पडलाय, व्याज दर खाली आले आहेत आणि कदाचित अजून खाली जातील, परंतु महागाई वाढेल. तेव्हा सगळेच पैसे एकाच प्रकारच्या पर्यायात ठेवू नका.
१५) सध्या व्हॉट्सअॅपवर भरपूर मेसेज फिरताना दिसतात की‘हीच गुंतवणुकीची संधी आहे.’ कसल्याशा स्कीममध्ये किंवा फंडामध्ये किंवा विम्यामध्ये पैसे घालण्याची त्यातून गळ घातली जाते. परंतु हीच वेळ आहे सावध राहण्याची. आपल्या मनातील भीतीचा वापर करून आपल्याला भुलविण्याचे प्रयत्न केले जातील. तेव्हा खबरदार व्हा! खरंच ती गुंतवणूक योग्य आहे का याबाबत जोवर पूर्ण विश्वास वाटत नाही तोवर पैसे देऊ नका. मुदत ठेवीत राहिले तरीही चालतील पण नुकसान होण्यापासून स्वत:ला वाचवा.
१६)घरातील कुटुंबीयांशी मिळकतीची काय सोय करता येईल यावर चर्चा करा. अडकलेल्या उद्योगाला उभारी देऊन पुन्हा नव्याने आयुष्य जगता येईल, यावर सामूहिकपणे तोडगा काढा. शिवाय कोणत्या प्रकारे यापुढे खर्च कमी ठेवून मिळकत वाढवता येईल याचासुद्धा विचार करा.
१७)कर्ज हे काही मर्यादेपर्यंतच उपयोगी असते. तेव्हा कर्जातून नक्की काय साध्य करायचंय आणि त्याची किती किंमत मोजावी लागते हे ध्यानात घ्या. शक्यतो मिळकतीच्या २५ टक्क्य़ांपेक्षा जास्त कर्जाचा हफ्ता नसावा.
१८) जर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम असेल, तर पुढच्या १२ ते २४ महिन्यांत ती टप्प्याटप्प्याने गुंतवा.
१९) तुमच्या घरातील मोलकरणीला, ड्रायव्हरला, बिल्डिंगमधील वॉचमनला कदाचित काही मदत लागेल. तेव्हा आपल्यापेक्षा आर्थिकरीत्या कमी सक्षम असणाऱ्यांना मदत करा. भरपूर पैसे असण्याने जे मानसिक समाधान मिळत नाही ते गरजवंताला वेळेवर मदत करण्याने मिळते.
२०) स्वत:मध्ये गुंतवणूक करा. रिकामा वेळ नवीन गोष्टी शिकण्यात घालवा. स्वत:मध्ये केलेली ही गुंतवणूक जास्त फायद्याची असते.
परिस्थिती तीच राहात नाही. बदलाचं चक्र सतत फिरत राहतं. तेव्हा काळाबरोबर बदला. सर्वासाठी करोना जरी त्रासदायक ठरला असला तरीही त्याने एक खूप मोठी जाणीव आज आपल्याला करून दिली आहे. आणि ती म्हणजे की, पैसे बँकेत राहतात, कामवाल्या आणि नोकर त्यांच्या घरी! आपण आणि आपलं कुटुंब हेच शेवटी जवळ असतं आणि आपल्यासाठी असतं. तेव्हा परत एकदा पेन, कागद आणि कॅल्क्युलेटर जवळ घ्या आणि आपल्या उद्योगांच्या आणि वैयत्तिक आर्थिक व्यवस्थापनाची सुरुवात करा.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.