https://images.loksatta.com/2020/04/assult.jpg?w=830
(संग्रहित छायाचित्र)

खासदार कराड यांच्या मुलांकडून भाजप कार्यकर्त्यांलाच मारहाण

खासदार कराड हे आपल्या मुलास कोटला कॉलनी या वॉर्डातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत.

by

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीतील संभाव्य उमेदवारीच्या कुरबुरीतून भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड यांच्या मुलांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे सदस्य कुणाल मराठे यांना मारहाण  केली. या प्रकरणी हर्षवर्धन व वरुण कराड व त्याच्या सहकाऱ्यावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका निवडणुका पुढे गेल्या असल्या तरी करोना काळात मदत करत असल्याने मारहाण झाल्याची तक्रार कुणाल मराठे यांनी दिली आहे. कोटला कॉलनी वॉर्डातून निवडणूक लढविण्यास इच्छुक दोन उमेदवारांमधील हा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.

खासदार कराड हे आपल्या मुलास कोटला कॉलनी या वॉर्डातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. याच वॉर्डात कुणाल उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. खासदारांच्या दोन्ही मुलांसह पवन सोनवणे नावाच्या कार्यकर्त्यांनी घरात घसून मारहाण केल्याची तक्रार मराठे यांनी दिली. या मारहाणीच्या घटनेची चित्रफीतही समाजमाध्यमांवर पसरली. कुणाल मराठे हे बांधकाम व्यावसायिक असून भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत. रात्री दहाच्या सुमारास घरी जेवण करत असताना दरवाजा ठोठावण्यात आला. हर्षवर्धन, वरुण व सोनवणे हे तिघे जण घरात घुसले. महापालिकेची उमेदवारी मिळणार असल्याचा दावा करून वॉर्डामध्ये फिरणे थांबव, असे धमकावण्यात आले. तसेच कोणालाही वॉर्डात मदत करायची नाही, अशी दमबाजी केली. मराठे यांना लाठय़ा-काठय़ांनी मारहाण केली. ते दुसऱ्या खोलीत गेल्याने बचावले. समाजमाध्यमांवरील चित्रीकरण ३५ सेकंदाचे असून त्यात मारहाण होताना दिसत असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीकडेच डॉ. कराड हे राज्यसभा सदस्य झाले आहेत.

‘भांडण सोडवत होतो’

वाटप  केल्या जाणाऱ्या कीटची चौकशी करण्यासाठी गेलो असता प्रमोद सोनावणे यांना जातिवाचक शिवीगाळ केल्यामुळे भांडण सुरू झाले. ते सोडविण्यासाठी गेलो होतो. तेव्हा माझ्या अंगावरील टी-शर्ट फाडण्यात आला. जाणीवपूर्वक राजकीय रंग दिला जात आहे, असे हर्षवर्धन कराड यांनी म्हटले आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.