https://images.loksatta.com/2020/05/arth01-2.jpg?w=830

अर्थ वल्लभ : तूच तुझ्या स्वप्नांचा शिल्पकार?

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

by

वसंत माधव कुळकर्णी

करोना विषाणूबाधेची लागण आणि पाठोपाठ बाजार घसरणीचा धक्काही आपण सोसत आहोत. अनेकांच्या गुंतवणुका तोटय़ात गेल्याचे दिसत आहे. ही घसरण २००८ मधील वैश्विक संकटासारखी नाही. लवकरच बाजार सावरेल अशी आशा जागवणारी विधानेही अधूनमधून कानावर येतात.

प्रत्येक आपत्तीजनक गोष्टीचे आपणच का बळी ठरतो, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला असेल. या प्रश्नाचे एक उत्तर असे आहे की, अनेक गुंतवणूकदार ‘कळपाच्या वर्तना’चे बळी ठरतात. ‘कळपाचे वर्तन’ हा मानवी गुणधर्म आहे. ज्यामुळे अनेक जण एका मोठय़ा गटाच्या (तर्कसंगत किंवा तर्कहीन) कृतीची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असतात. ‘कळपांच्या वर्तना’ची दोन मानसशास्त्रीय कारणे आहेत. पहिले कारण सामाजिक दबाव असणे. सामाजिक दबाव एक अशी शक्ती आहे की, लोकांना तसे वर्तन न केल्यास एखाद्या समूहातून (कळपातून) वगळले जाण्याची किंवा समूहाने स्वीकारले न जाण्याच्या भीतीतून असे वर्तन घडते. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारसुद्धा अनेकदा ‘कळपाच्या वर्तना’चे बळी ठरतात.

https://www.loksatta.com/wp-content/plugins/a3-lazy-load/assets/images/lazy_placeholder.gif
https://images.loksatta.com/2020/05/tab01.jpg

एकरकमी किंवा एसआयपीसाठी फंड निवड करीत असताना उपलब्ध म्युच्युअल फंडांतून त्या त्या फंड गटाची प्रतीके / मानचिन्ह (आयकॉनिक फंड) समजल्या जाणाऱ्या फंडांची निवड ‘कळपाच्या वर्तना’मुळे केली जाते. म्युच्युअल फंडांच्या समभाग मालमत्तेपैकी प्रत्येकी १९ टक्के गुंतवणूक लार्जकॅप आणि मल्टीकॅप फंड गटात आहे. लार्जकॅप फंड गटात मोठी मालमत्ता असलेले फंड हे प्रतीकात्मक फंड समजले जातात. या प्रतीकात्मक फंडांची ढिसाळ कामगिरी गुंतवणूकदारांच्या चिंतेचा विषय आहे. अव्वल लार्जकॅप आणि ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ यादीतील लार्जकॅप यांची तुलना हा आजच्या लेखाचा विषय आहे.

म्युच्युअल फंडाच्या जोखमीचे मापन करण्यासाठी पोर्टफोलिओचे प्रमाणित विचलन विचारात घेतले जाते. लोकसत्ता कर्ते फंड आणि प्रतीकात्मक लार्जकॅप फंड यांचे मानदंड एकच असले तरी दोन्हींपैकी लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडांच्या पोर्टफोलिओचे प्रमाणित विचलन प्रतीकात्मक फंडाच्या तुलनेत कमी आहे. उपलब्ध आकडेवारीवरून असे दिसून येते की, लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड पोर्टफोलिओचा ‘शार्प रेशो’ ३ वर्षे आणि ५ वर्षे कालावधीत प्रतीकात्मक फंडांपेक्षा अधिक आहे. म्हणजेच प्रतीकात्मक फंडाचे निधी व्यवस्थापक लोकसत्ता कर्ते फंडांच्या व्यवस्थापकांपेक्षा अधिक धोका पत्करतात, हे स्पष्ट होते.

क्रिसिल रँकिंग

दर तीन महिन्यांनी प्रकाशित होणारे क्रिसिल रँकिंग हे फंडांची कार्यक्षमता मोजण्याचे उत्तम साधन आहे. क्रिसिल ही रोख्यांची पत निश्चित करणारी संस्था असून त्या तीन महिन्यांतील फंडाच्या तीन आणि पाच वर्षांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून पाच श्रेणींमध्ये विभागणी होते. ज्या फंडांची या संदर्भात चर्चा होत आहे त्या फंडाचे रँकिंग खालीलप्रमाणे आहे.  (तिसरे कोष्टक पाहा)

https://www.loksatta.com/wp-content/plugins/a3-lazy-load/assets/images/lazy_placeholder.gif
https://images.loksatta.com/2020/05/tab02.jpg

गुंतवणुकीसाठी फंड निवड करताना निवडलेले फंड आपल्याला वित्तीय ध्येयांपर्यंत नेण्यास किती सक्षम आहेत हे संख्याशास्त्राच्या आधारे तपासून पाहिले पाहिजे. मानदंडापेक्षा सातत्याने कमी परतावा देणारे फंड गुंतवणुकीला पुरेसा वेळ देऊनदेखील आपल्या वित्तीय ध्येयांपर्यंत नेण्यास कमी पडतील. मोठी मालमत्ता असणारे फंड पाच वर्षांत सर्वात ढिसाळ कामगिरी असलेल्या फंडांचे प्रतिनिधी आहेत. एखाद्या फंडाची निवड ऐकीव माहिती किंवा अंत:प्रेरणेने करणे हे ‘कळपाच्या वर्तना’चे बळी ठरण्यासारखे आहे. फंड निवड सांख्यिकीय साधनांचा वापर करून करणे नेहमीच हिताचे असते. टबमधून विस्थापित झालेले पाणी पाहून आर्किमिडीजला ‘आर्किमिडीज’ तत्त्वाचा शोध लागला. या तत्त्वाचा उपयोग आधुनिक काळात जहाज आणि पाणबुडय़ा बांधण्यासाठी होतो. आर्किमिडीजचे तत्त्व कालातीत आहे, फंड निवडीचे निकषसुद्धा असेच वर्षांनुवर्षे सिद्ध झालेले आहेत. या मोठय़ा नाममुद्रांचा मोह आणि फंडनिवडीच्या निकषांबाबतची निरक्षरता गुंतवणूकदारांना ‘कळपाच्या वर्तना’चे बळी पडण्यास भाग पाडत आहे. निवड केलेल्या फंडांची कार्यक्षमता ‘लोकसत्ता कर्ते’ म्युच्युअल फंड यादीतील फंडांना मिळालेल्या क्रिसिल रॅकिंगने सिद्ध झाली आहे. लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडांच्या यादीतील फंड वित्तीय ध्येयापर्यंत नेण्यास हे फंड सक्षम असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. फंडांचे मानदंड आणि फंड परतावा यांच्यातील फरक वर्षांगणिक वाढलेला दिसत आहे. प्रतीकात्मक लार्जकॅप फंड गुंतवणुकीत असणे हे भोक पडलेल्या बोटीतून पैलतीर गाठू अशी दिवास्वप्ने पाहण्यासारखे आहे. ही भोक पडलेली बोट वित्तीय साध्य पूर्ण करू शकणार नाही. एलआयसी एमएफ लार्जकॅप, एडेल्वाईज लार्जकॅपसारख्या अप्पर मिडल क्वारटाईल रॅकिंग असलेल्या फंडांना नाकारून मोठी मालमत्ता असलेल्या दर्जाहीन फंडांचा आग्रह धरणे म्हणजे यापेक्षा करंटेपणा दुसरा नसेल.

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.