यावर्षी वाढदिवस साजरा करू नये : नितीन गडकरी

by
https://www.nagpurtoday.in/wp-content/uploads/2020/05/Nitin-Gadkari-2-600x315.jpg

नागपूर: यावर्षी कोरोनाचे थैमान संपूर्ण जगात सुरु आहे. त्यामुळे गेल्या मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन आहे. जगात अनेक लोक या रोगामुळे प्रभावित झालेले आहेत. अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. अशा वेळी अनेक कुटुंबांना आधार देण्याच्या कामात सर्व कार्यकर्ते लागले आहेत.

अशा वेळी आपला वाढदिवस साजरा करणे योग्य नाही. त्यामुळे माझ्या मित्रांना, सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना व नागरिकांना माझी विनंती आहे की, यावर्षी निर्माण झालेली बिकट परिस्थिती लक्षात घेता कोणीही अभिनंदन देण्याकरिता किंवा वैयक्तिक भेटायला येऊ नये. त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन होईल व सुरक्षित अंतर पाळण्यास कठीण होईल. अशावेळी आपण आपापल्या क्षेत्रात लॉकडाऊनचे नियम पाळून गरजूंना सहकार्य करावे. आपले प्रेम व शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच.

यावर्षी कुठलाही खर्च करून वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवू नये व एकत्र येऊ नये, ही नम्र विनंती मी या माध्यमातून करीत आहे. सरकारने घातलेल्या अटी व नियमांचे काटेकोर पालन करावे व घरातच राहून आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, ही नम्र विनंती. लॉकडाऊननंतर पुनश्च आपणाशी मी वैयक्तिक भेटणारच आहे, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.