https://images.loksatta.com/2020/05/spritual.jpg?w=830
(संग्रहित छायाचित्र)

३०९. ऐक्याचा मंत्र

महाज्ञानी व्यासांनी वेदार्थ, सकळ पुराणं लिहिली; पण अंत:करणात ते समाधानी नव्हते.

by

चैतन्य प्रेम

वाचकहो, सोमवार २३ मार्चनंतर आपण संत एकनाथ महाराज यांच्या ‘एकनाथी भागवत’ या ग्रंथाचं चिंतन खंडित केलं होतं. ते आज सुरू करीत आहोत. ते करताना आधी या चिंतनामागची भूमिका काय आहे, ‘एकनाथी भागवता’वरच आपण चिंतन का करीत आहोत, ते करण्यामागे काय दृष्टिकोन आहे, तो जाणून घेऊ. ‘श्रीमद् भागवता’च्या एकादश स्कंधावर- म्हणजे अकराव्या स्कंधावर एकनाथ महाराजांचा हा ग्रंथ आधारित आहे. आता इतक्या अनेक स्कंधांपैकी अकरावाच स्कंध नाथांनी का निवडला? तर, दशेंद्रियांच्या पकडीत जीव अडकला आहे. पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं, यांच्या पकडीत जीव आहे. पण तसं पाहता, या दहा इंद्रियांना नाचवणारं जे अकरावं इंद्रिय आहे ना, ते आहे मन! हे मनच स्वत:ची प्रगती करू शकतं तसंच अधोगतीही करू शकतं, आत्महित साधण्यास साह्य़भूत होऊ शकतं तसंच आत्मघातही करू शकतं. त्यामुळे या मनाला एका दशेत स्थिर करण्यासाठी नाथांनी एकादश स्कंधच निवडला आहे. मराठीत एखादा ग्रंथ लिहावा, असं नाथांच्या मनात होतंच. तो कोणता लिहावा, असं त्यांनी संतांना विचारलं. त्यांनी एकादश स्कंधावर लिहायला सांगितलं. हा स्कंध म्हणजे भगवान कृष्णांनी उद्धवाला सांगितलेलं ज्ञान आहे. त्याला ‘उद्धवगीता’ही म्हणतात. पाहा बरं! ज्ञानदेवांनी ‘गीते’चा अर्थ ‘ज्ञानेश्वरी’तून विस्तारानं सांगितला, तर एकनाथांनी ‘उद्धवगीते’चं समग्र दर्शन घडवलं. ‘गीता’ ऐन रणांगणात एका योद्धय़ाला सांगितली गेली, तर ‘उद्धवगीता’ ही अवतार समाप्तीच्या आधी सांगितली गेली. अर्जुन आणि उद्धव दोघं सखाच होते, तर श्रीकृष्ण त्यांचे पथदर्शक सद्गुरूच होते! अर्जुनाला त्यांनी कर्तव्यसन्मुख करीत लढायला उभं केलं, तर उद्धवाला निर्लिप्त होऊन परमतत्त्वाशी एकरूप करवलं. पण दोन्ही मार्ग कृष्णमयता साधणारेच होते. भगवंतानं उद्धवाला ज्ञान सांगितलं, हे खरं. पण प्रेम हाच त्या ज्ञानाचा प्राण आहे! म्हणूनच तर या भागवताचं सार सर्वप्रथम ब्रह्मदेवानं ऐकलं आणि तो सृष्टीनिर्माता संदेहरहित झाला! त्यानं हे ज्ञान देव, मानव आणि दानवांत सारखाच मान असलेल्या नारदांना दिलं, त्यानं ‘‘नारदु निवाला। अवघा अर्थमयचि जाला।’’ अशी एकरूपता नारदांना लाभली. ते ज्ञान नारदांनी व्यासांना दिलं. महाज्ञानी व्यासांनी वेदार्थ, सकळ पुराणं लिहिली; पण अंत:करणात ते समाधानी नव्हते. या भागवत ज्ञानानं व्यासांच्या संशयाचं दहन होऊन त्यांना निजसमाधान लाभलं. हे ज्ञान त्यांनी मग शुकाला आणि शुकानं परीक्षिताला दिलं. तेच हे भागवत आहे! ‘भागवत’ ज्ञानाचा प्रवास हा असा आहे. पण आधीच म्हटल्याप्रमाणे हे निव्वळ ज्ञान नाही. कारण व्यासांकडे ज्ञान कमी का होतं? सृष्टी ज्यानं निर्मिली, त्या ब्रह्मदेवाकडे ज्ञान कमी का होतं? तेव्हा ज्ञान होतं, पण पूर्ण प्रेमाची जोड नसल्यानं त्यात तृप्ती नव्हती, पूर्णत्व नव्हतं. मग हे कुणाचं प्रेम आहे? तर श्रीकृष्णरूपी सद्गुरूचंच प्रेम! त्यामुळे ही ‘उद्धवगीता’ साधकाला जगाच्या भ्रामक ओढींतून सोडवत सद्गुरूमयता शिकवणारी आहे. त्यामुळेच ‘एका जनार्दनी’ अशीच नाममुद्रा सदैव जपणाऱ्या एकनाथांना याच स्कंधावर लिहिण्यात आनंद वाटला, यात नवल नाही! तेव्हा या ग्रंथावर आधारित ‘एकात्मयोग’चा हेतूही सद्गरूमयता, ऐक्यता हाच आहे. पण हा ग्रंथ काही सामान्य नाही. नाथ फार मधुर शब्द वापरतात. ते म्हणतात, हे भगवंताचं हृद्गत आहे. ते कुणाला कळेल? पाहूयात!

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.