https://images.loksatta.com/2020/02/VK.jpg?w=830
RCB ने केली घोषणा

IPL 2020: “नवीन दशक, नवीन RCB…”; विराटच्या संघाने केली त्या बदलाची घोषणा

बऱ्याच दिवसापासून याबद्दलची चर्चा रंगली होती

by

आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोलकात्यात पार पडलेल्या लिलावात सर्व संघमालकांनी आपापल्या पसंतीच्या खेळाडूंवर बोली लावली आहे. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (आरसीबी) संघ आगामी हंदामात नवीन नावाने मैदानात उतरणार असल्याच्या जोरदार चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या. मात्र आता या चर्चांना पुर्नविराम लागला आहे. आरसीबीने आज व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्ताने एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे.

झालं असं की. आरसीबीने आपल्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवरुन संघाचा लोगो अचानक हटला होता. संघाचं नाव बदल्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असल्याचेही वृत्त समोर आले होते. मात्र आज आरसीबीने औपचारिक घोषणा करुन आपल्या नावात कोणताही बदल न करता लोगो बदलत असल्याचे स्पष्ट केलं. आपल्या सर्व सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन आरसीबीने नवीन लोगो पोस्ट केला आहे. आरसीबीने तिसऱ्यांदा आपला लोगो बदलला आहे.

कसा आहे नवा लोगो?

आरसीबीच्या नव्या लोगोमध्ये सिंह आणि संघाचे नाव कायम असून लोगोची रचना मात्र बदलण्यात आली आहे. आधीच्या गोलाकार लोगोऐवजी आता आरसीबीने उभ्या आकाराचा लोगो स्वीकारला आहे. तसेच या लोगोचा रंगही थोडा गडद करण्यात आला असून लाल रंगाच्या बॅकग्राऊण्डवर गोल्ड रंगाचा सिंह या लोगोमध्ये दिसतो. “नवीन दशक, नवीन आरसीबी, नवीन लोगो,” अशी कॅप्शन या फोटो पोस्टला देण्यात आली आहे.

याआधी दिल्लीच्या संघानेही आपलं नाव बदललं होतं. दिल्ली डेअरडेविल्सवरुन संघ दिल्ली कॅपिटल्स या नावाने मैदानात उतरला होता. आश्चर्यकारकरित्या दिल्लीच्या संघाला याचा फायदाही झाला होता. त्यामुळे बंगळुरुचं प्रशासन कोणत्या नवीन नावाने मैदानात येतोय का याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र आरबीसीने नाव न बदलता केवळ लोगो बदलला आहे. त्यामुळे आता या बदललेल्या लोगोबरोबर आरसीबीचे नशीब बदलतं का हे येणारा काळच सांगेल.