औरंगाबादचं नाव कुठल्याही क्षणी संभाजी नगर होऊ शकतं-चंद्रकांत खैरे
उद्धव ठाकरे कधीही औरंगाबादकरांना सरप्राईज देतील असंही खैरे यांनी म्हटलं आहे
by लोकसत्ता ऑनलाइनऔरंगाबादचं नाव कुठल्याही क्षणी संभाजीनगर होऊ शकतं असं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. औरंगाबादकरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही सरप्राईज देतील. उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्यानंतर त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कोणीही विरोध करणार नाही असंही चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केलं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरें यांनीही औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची भूमिका घेतली आहे. त्याबाबत विचारलं असता, “राज ठाकरे हे आत्ता मागणी करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे १९८८ पासून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच उल्लेख करत आहेत. शिवसेनेनेच ही मागणी कायम लावून धरली होती. औरंगाबादचं नाव बदलून संभाजी नगर ठेवलं जावं हे तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यामुळे ते स्वप्न उद्धव ठाकरेच पूर्ण करतील इतर कुणालाही ते जमणार नाही” असंही खैरे यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
औरंगाबादचं नाव संभाजी नगर केलं जावं ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जाते आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ही मागणी केली. मात्र सुरुवातीपासूनच औरंगाबादचं नाव हे संभाजी नगर केलं जावं ही शिवसेनेचीच भूमिका होती आणि त्यासाठी आम्ही आंदोलनही केलं आहे. असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा – औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? – राज ठाकरे
गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही औरंगाबादचं नाव संभाजी नगर झाल्यास काय हरकत आहे ? असा प्रश्न विचारला होता. मात्र ही सुरुवातीपासूनच शिवसेनेची भूमिका आहे असं चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केलं.