Love Aaj Kal Movie Review: गुंतागुंतीचा ‘लव्ह आज कल’
सारा आणि कार्तिकची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे
by लोकसत्ता ऑनलाइनगेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा लव्ह आज कल हा चित्रपट आज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह आज कल’चा सिक्वेल आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी चित्रपटाच्यात नावत बदल न करता साधारण सारख्याच आशयाची कथा या सिक्वेलमध्ये मांडली आहे. लव्ह आज कलच्या पहिल्या भागात सैफ अली खान, दीपिका पदूकोण, ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते. सिक्वेलमध्ये सारा, कार्तिक आणि रणदीप हुड्डाने भूमिका साकारली आहे.
चित्रपटाची सुरुवात ही जोई (सारा अली खान)च्या एण्ट्रीने होते. जोईला इवेंट मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचे असते. ती तिच्या करिअरच्या बाबतील अतिशय महत्वकांक्षी असते. सोबतच बिनधास्त जोई अनेक मुलांसोबत मजा मस्ती करता दिसते. पण कोणत्याही मुलाला कमिटमेट देण्यास घाबरते. तर दुसरीकडे वीर (कार्तिक आर्यन) स्वत:च्या विश्वात रमणारा सरळ आणि साधा मुलगा असतो. जोई दिल्लीमधील रघु (रणदीप हुड्डा)च्या कॅफेमध्ये बसून दररोज काम करत असते. तेथेच वीर आणि जोईची भेट होते. वीर तिच्या प्रेमात पडतो. पण काही करणामुळे त्या दोघांमध्ये भांडणे होतात.
त्यांची भांडणे पाहून रघुला त्याच्या कॉलेजमधील दिवसांची आठवण होते. तो त्या दोघांना त्याची लव्ह स्टोरी सांगतो. तेव्हा चित्रपटाची कथा १९९०च्या दशकात जाऊन पोहोचते. रघुची लव्हस्टोरी ऐकून जोई आणि वीर पुन्हा एकत्र येतात का? रघुच्या आयुष्यात नेमकं काय घडतं? हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
चित्रपटातील काही सीन हे वर्तमानकाळात रंगविण्यात आले आहेत. तर काही भाग हे भूतकाळातील दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रपटाची कथा प्रेक्षकांना गोंधळात नक्की टाकते. तसेच कार्तिक आर्यनची दुहेरी भूमिका प्रेक्षकांना आणखी गुंतागुंतीची वाटते. एकंदरीत चित्रपटातील २०२०चा काळ आणि १९९०चा काळ दाखवण्यास निर्मात्यांना अपयश आले आहे. सुरुवातीच्या आर्ध्या तासानंतर चित्रपट कंटाळवाणा वाटू लागतो. चित्रपटात प्रेमाची फिलॉसफी दाखवल्यामुळे चित्रपट उगाचच ताणल्या सारखा वाटतो. पण चित्रपटात दाखवण्यात आलेली काही दृश्ये आकर्षक वाटतात. चित्रपटातील ‘आना तो पूरी तरह आना’ सारखे काही संवाद प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. चित्रपटातील ‘शायद’ आणि ‘हा में गलत’ ही गाणी दमदार आहेत.
‘पती, पत्नी और वो’ चित्रपटातील कार्तिकच्या अभिनया पुढे या चित्रपटातील अभिनय फिका वाटू लागतो. त्याची दुहेरी भूमिका प्रेक्षकांना गोंधळात टाकणारी आहे. दुसरीकडे चांगला अभिनय करण्याचा साराचा प्रयत्न फसला आहे. काही ठिकाणी तिची ओव्हर अॅक्टिंग वाटू लागते. पण सारा आणि कार्तिकला एकत्र पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा मात्र पूर्ण झाली आहे. २००९ साली प्रदर्शित झालेला ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. पण हा चित्रपट फारशी कमाई करणार नसल्याचे म्हटले जात आहे.