प्रदूषणाने होणाऱ्या आजारातून भारताला आर्थिक फटका
भारतात जीवाश्म इंधनामुळे प्रदूषण होऊन लोकांना जे रोग होतात
by लोकसत्ता ऑनलाइनभारतात जीवाश्म इंधनामुळे प्रदूषण होऊन लोकांना जे रोग होतात, त्याच्या निवारणासाठी आरोग्यावर होणारा खर्च १५० अब्ज डॉलर्सचा आहे, असे मत एका अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. जगात प्रदूषणामुळे होणाऱ्या रोगांवर एवढा खर्च दुसऱ्या कुठल्याही देशात होत नाही. ग्रीनपीस साउथइस्ट आशिया या संस्थेने हा अहवाल प्रसिद्धीस दिला असून त्यात सेंटर फॉर रीसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर या संस्थेने दिलेल्या माहितीचा समावेश केला आहे.
भारतात जीवाश्म इंधनांमुळे होणाऱ्या हवा प्रदूषणामुळे आरोग्यावर जे दुष्परिणाम होतात, त्यामुळे सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा ५.४ टक्के भाग खर्च होतो. पीएम २.५, ओझोन व नायट्रोजन ऑक्साइड यामुळे आरोग्यावर जे दुष्परिणाम होतात त्यांचा विचार करून २०१८ हे वर्ष आधारभूत मानून खर्चाचा अंदाज काढण्यात आला आहे. जगात प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांवर एकून वार्षिक सकल उत्पन्नाच्या ३.३ टक्के म्हणजे २.९ लाख कोटी डॉलर्स खर्च होतात. भारतात एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५.४ टक्के खर्च हा प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांवर होतो. हे प्रमाण १०.७ लाख कोटी रुपये म्हणजे १५० अब्ज डॉलर्स आहे.
आणखी वाचा – कर्करोगाचे निदान केवळ रक्त तपासणीने, नवीन संशोधन
भारताचा क्रमांक प्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्य खर्चात तिसरा आहे. पहिला क्रमांक चीनचा असून त्यांचा खर्च ९०० अब्ज डॉलर्स आहे. तर अमेरिकेचा खर्च ६०० अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे. भारतात दरवर्षी १० लाख मृत्यू व ९ लाख ८० हजार अकाली मृत्यू हे प्रदूषणामुळे होतात. त्यामुळे हे नुकसान १०.७ लाख कोटींच्या घरात आहे. दरवर्षी नायट्रोजन डायॉक्साइड प्रदूषणामुळे भारतात साडेतीन लाख अस्थमा रुग्ण असतात. जीवाश्म इंधन प्रदूषणाने भारतात १२.८५ लाख मुलांना अस्थमा होतो. तसेच कामाचे ४९ दिवस हे प्रदूषणामुळे आजारात वाया जातात.