पुणे: …आणि विद्यापिठातील विद्यार्थ्यांसाठीची RSS संदर्भातील कार्यशाळा झाली रद्द
विद्यार्थ्यांसाठी होणार होते ‘नोइंग आरएसएस’ या विषयावरील व्याख्यान
by लोकसत्ता ऑनलाइनसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी विश्वसंवाद केंद्रातर्फे आयोजित ‘नोइंग आरएसएस’ या कार्यक्रमास जाण्यावरून गुरुवारी वाद निर्माण झाला. ‘नोइंग आरएसएस’ या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबाग कार्यालयात जाण्याच्या सूचना दिल्याने युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेससह इतर संघटनांनी आक्षेप नोंदवला. या आक्षेपानंतर अखेर ही कार्यशाळा रद्द करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी विश्वसंवाद केंद्राने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांचे ‘नोइंग आरएसएस’ या विषयावरील व्याख्यान शनिवार पेठेतील मोतीबाग येथे शनिवारी (१५ फेब्रुवारी) आयोजित केले आहे. या कार्यक्रमाची माहिती वृत्तपत्र आणि संज्ञापन विभागाने (रानडे इन्स्टिटय़ूट) नोटिशीद्वारे देऊन त्याचा वेळापत्रकात समावेश केला. त्यावर अनेक विद्यार्थी संघटनांना आक्षेप घेतला. त्यानंतर गुरुवारी रात्री उशीरा ही कार्यशाळा रद्द केल्याची माहिती देण्यात आली.
विभागप्रमुखांचे स्पष्टीकरण
या प्रकरणावरुन वाद निर्माण झाल्यानंतर विद्यार्थ्यांवर कार्यक्रमाला जाण्याची सक्ती नसून, वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे वृत्तपत्र आणि संज्ञापन विभागाने स्पष्ट केलं. “संस्था-संघटनांकडून कार्यक्रमाची निमंत्रणे येत असतात. त्या विषयी विद्यार्थ्यांना सांगितलेही जाते. रा. स्व. संघाच्या कार्यक्रमाचा वेळापत्रकात उल्लेख केल्याने सक्ती असल्याचा समज झाला. वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ज्यांना जायचे असेल, ते जाऊ शकतात. विद्यार्थ्यांवर सक्ती नाही,” अशी माहिती वृत्तपत्र आणि संज्ञापन विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी दिली.
विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष म्हणतात
विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी यांनीही या प्रकरणात स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला येण्याची सक्ती नाही असं सांगितलं. “विद्यार्थ्यांवर सक्ती करण्याचा प्रश्नही येत नाही, त्यांच्या इच्छेवर आगे. शैक्षणिक दृष्टिकोनातून हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना विविध विचारधारांची ओळख व्हावी हा त्याचा उद्देश आहे. हा कार्यक्रम म्हणजे नेहमीच्या कार्यक्रमाचा भाग आहे. संवाद वाढावा, समज-गैरसमज दूर व्हावेत हा विचार आहे,” असं कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र अखेर ही कार्याशाळा रद्द करण्यात
सुप्रिया सुळे यांनीही घेतला होता आक्षेप
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नेमकं काय सुरु आहे?, असा सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावरुन ट्विट केलं होतं. “विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला पाठविण्याची आयडीया कुणाची? संज्ञापन आणि वृत्तपत्र विभागात खास नोटीस काढून, वेळापत्रकात संघाशी संबंधित कार्यक्रम जाणीवपूर्वक लावला. कुलगुरुंचीही याला संमती आहे का?,” अशी विचारणा सुळे यांनी ट्विट करुन केली होती.
या प्रकरणावरुन वाद झाल्यानंतर यापुढे विविध संघटनांची माहिती देणारी व्याख्याने विभागातच होतील, असा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.