https://images.loksatta.com/2020/02/Pulwama.jpg?w=830
पुलवामा हल्ला

…म्हणून पुलवामा हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे; राष्ट्रवादी काँग्रेची मागणी

पुलवामा हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं

by

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. या हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले होते. आज या भीषण हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शहीद जवांनांना देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. मात्र पुलवामा हल्ल्याचं सत्य देशाच्या जनतेला जाणून घ्यायचं असल्याने या हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी  पुलवामा हल्ल्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

काय म्हणाले मलिक?

“पुलवामा हल्ल्यात आपले सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात आजपर्यंत आरडीएक्स कुठून आले आणि वाहन घटनास्थळावर कसे पोहोचले याची चौकशी करण्यात आलेली नाही,” असं मत मलिक यांनी व्यक्त केलं. “हल्ल्यात वापरण्यात आलेल्या वाहनाचा वाहन चालक तुरूंगात होता. तो कसा बाहेर आला? लोकांना सत्य जाणून घ्यायचे असेल म्हणून चौकशी केली पाहिजे,” अशी मागणी मलिक यांनी केली आहे. “लोकसभा निवडणुकीदरम्यान या विषयावरुन राजकारण करण्यात आले मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली नाही,” असा आरोपही मलिक यांनी केला आहे.

मोदींकडून श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरुन पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवनांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘मागील वर्षी पुलवामा येथे झालेल्या भीषण हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या जवानांना मी श्रद्धांजली अर्पित करतो. हे सर्व जवान असमान्य होते. त्यांनी देशसेवा आणि मातृभूमिच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. देश त्यांच्या हौतात्म्याला कधीही विसरणार नाही,’ असं ट्विट मोदींनी केलं आहे.