https://images.loksatta.com/2020/02/aamir.jpg?w=830

आमिर-करीनाचा लालसिंग चड्ढा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

'व्हॅलेंटाइन डे'चं निमित्त साधत करीनाचा लूकही प्रदर्शित करण्यात आला

by

वर्षभरात एकच चित्रपट हे गणित कसोशीने सांभाळणारा बॉलिवूड अभिनेता आमिर खान ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’नंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे. त्याचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ‘लालसिंग चड्ढा’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये आमिरसोबत अभिनेत्री करीना कपूर-खान स्क्रीन शेअर करत आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटातील आमिरचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत करीनाचाही लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर करीनाचा फर्स्ट लूक शेअर करत ही माहिती दिली. प्रदर्शित झालेल्या फोटोमध्ये करीना पंजाबी मुलीच्या रुपात दिसत असून तिने आमिरला मिठी मारली आहे. परंतु यात आमिर पाठमोरा उभा आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने करीना बऱ्याच वर्षांनंतर पंजाबी मुलीची भूमिका साकारत असल्याचं दिसून येत आहे.

‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटातील करीनाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यासोबतच या चित्रपटाची रिलीज डेटही सांगण्यात आली आहे. त्यानुसार हा चित्रपट २०२० मध्ये नाताळला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी प्रेक्षकांना जवळपास वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान,१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.