https://images.loksatta.com/2020/02/Raj-Thackeray-3.jpg?w=830
संग्रहीत

हिंदू जननायक म्हणू नका – राज ठाकरे

राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर

by

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना औरंगाबाद शहरात लागलेल्या हिंदू जननायक पोस्टरबाबत प्रश्न विचारले. यावर राज ठाकरे म्हणाले की, ‘हिंदू जननायक’ ही उपाधी आमच्या पक्षाकडून आलेली नाही. ती एका वृत्तवाहिनीनं दिली आहे. हवं असल्यास त्यांना विचारा,’ असं सांगतानाच, ‘मला हिंदू जननायक म्हणू नका,’ असं आवाहनही त्यांनी केलं. शरद पवारांशी तुमचे संबंध अजूनही चांगले आहेत का? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी मिश्किलपणे हसत माझे आणि शरद पवार यांचे अजूनही चांगले राजकीय संबंध असल्याचे सांगितले. आपल्याकडं भेटीचं रूपांतर लगेचच मैत्रीत केलं जातं. हा महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना राज ठाकरे यांना शिवसेनेनवर अप्रत्यक्षपणे टीका केली. औरंगाबादचं नामाकरण करणे हा शिवसेनेचा अजेंडा होता? तुम्हीही तोच अजेंडा घेत आहात का? त्यावर बोलताना ते म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत, असा टोलाही यावेळी लगावला.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस औरंगाबादेत मुक्कामी आहेत. शहरातील विविध चौकात फलकांवर औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करावे या मागणीचा मनसेकडून जोर वाढला आहे. तसेच महापालिका निवडणुकांची तयारी करण्याच्या दृष्टीने राज ठाकरे औरंगाबाद येथे मुक्कामी येणार असल्याने शहरातील प्रमुख चौकात त्यांना ‘हिंदू जननायक’ अशी बिरुदावली लिहिली आहेत. त्यावर प्रश्न विचारला असता मला हिंदू जननायक म्हणून नका, असे ते म्हणाले. शरद पवारांशी तुमचे संबंध अजूनही चांगले आहेत का? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी मिश्किलपणे हसत माझे आणि शरद पवार यांचे अजूनही चांगले राजकीय संबंध असल्याचे सांगितले.

मनसेच्या केवळ झेंड्यात बदल झाला आहे, भूमिका कोणतीही बदलली नाही, हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्यांंनी कधी भूमिका घेतली का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला विचारला. तसेच नव्या झेंड्याबाबात कोणतही नोटीस आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

कसा असेल राज ठाकरेंचा औरंगाबाद दौरा?

१४ फेब्रुवारी रोजी मनसेमधील पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे भेटणार असून १५ फेब्रुवारीला शिक्षक संघटनेच्यावतीने होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पदाधिकाऱ्यांचा जाहीर मेळावाही राज ठाकरे घेणार असून या दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी, गड-किल्ले संवर्धनासाठी झटणारी मंडळी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या गाठीभेटी राज ठाकरे घेणार आहेत.

दरम्यान, गुरूवारी औरंगाबाद शहरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. बाबा पेट्रोल पंपाजवळील चौकात मनसेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने जमल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. ‘राजसाहब अंगार हैं’ अशा घोषणा देत दुचाकी फेरी काढण्यात आली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते उभे होते. प्रमुख रस्त्यांवर फटाके वाजवण्यात आले. मनसेचा नवा झेंडा दुचाकींवर लावत मोठय़ा संख्येने कार्यकर्ते स्वागतासाठी तयार होते. गुलमंडी भागात त्यांचे जंगी स्वागत झाले. विविध क्षेत्रांतील मंडळींशी राज ठाकरे पुढील दोन दिवसांत संवाद साधणार आहेत. त्यांच्या समवेत बाळ नांदगावकर, आमदार राजू पाटील, अनिल शिदोरे आदी नेते औरंगाबादेत दाखल झाले आहेत.