https://images.loksatta.com/2020/02/Raga.jpg?w=830
राहुल गांधींचा भाजपावर निशाणा

“पुलवामा हल्ल्याचा फायदा कोणाला झाला?”; राहुल गांधींचा भाजपावर निशाणा

पुलवामा हल्ल्यासंदर्भात राहुल गांधींनी तीन प्रश्न उपस्थित केले आहेत

by

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. या हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले होते. आज या भीषण हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शहीद जवांनांना देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. मात्र अशाच काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात तीन प्रश्न उपस्थित करत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. पुलवामा हल्ल्याला एक वर्ष झाल्यानिमित्त राहुल गांधींनी या हल्ल्यात शहीद जवानांच्या शवपेट्यांचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये राहुल यांनी तीन प्रश्न विचारले आहेत.

काय म्हणाले आहेत राहुल गांधी ट्विटमध्ये

“आज आपण पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या ४० शहीद जवांनाच्या हौतात्माचे स्मरण करत आहोत. त्यानिमित्त आपण काही प्रश्न विचारायला हवेत… १) या हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?, २) या हल्ल्याच्या तपासामधून काय निष्पन्न झालं? ३) ज्या सुरक्षासंदर्भातील त्रुटींमुळे हा हल्ला झाला त्यासाठी भाजपा सरकारमधील कोणत्या व्यक्तीला जबाबदार धरण्यात आलं?,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. या मधून त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपा नेत्याची टिका

राहुल गांधीच्या या ट्विटवरुन दिल्लीतील भाजपा नेते कपील मिश्रा यांना राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. “राहुल गांधी तुम्हाला लाज वाटायला हवी. पुलवामा हल्ल्यामुळे कोणाला फायदा झाला असं तुम्ही विचारत आहात? इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येने कोणाचा फायदा झाला असा सवाल देशाने विचारल्यास काय उत्तर द्याल? एवढ्या खालच्या थराचे राजकारण करु नका. थोडी तरी लाज बाळगा,” असं शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरुन पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवनांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘मागील वर्षी पुलवामा येथे झालेल्या भीषण हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या जवानांना मी श्रद्धांजली अर्पित करतो. हे सर्व जवान असमान्य होते. त्यांनी देशसेवा आणि मातृभूमिच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. देश त्यांच्या हौतात्म्याला कधीही विसरणार नाही,’ असं ट्विट मोदींनी केलं आहे.

राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्याला एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या ट्विटवरुन नवीन राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.