https://images.loksatta.com/2020/02/PMModi-3.jpg?w=830
मोदी #TumKabAaoge?

मोदी #TumKabAaoge?; ‘व्हॅलेंटाइन डे’साठी मोदींना थेट शाहीनबागेतून आमंत्रण

मोदींसाठी एक खास गिफ्टही आंदोलकांनी घेतलं आहे

by

सुधारित नागरिकत्व कायाद्याविरोधात (सीएए) शाहीनबाग येथे आंदोलन करणाऱ्या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण दिलं आहे. शुक्रवारी व्हॅलेंटाइन डेनिमित्त मोदींनी शाहीनबाग येथे येऊन आमच्याबरोबर प्रेमाचा दिवस साजरा करावा असं या महिलांनी म्हटलं आहे. सीएए हा कायदा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी १५ डिसेंबरपासून शाहीनबागेत अनेक महिला आंदोलनाला बसल्या आहेत. व्हॅलेंटाइन डेनिमित्त या महिलांनी मोदींसाठी एक लव्ह साँग म्हणजेच प्रेमगीत सादर करुन एक खास ‘सरप्राइज’ भेटवस्तूही दिली. या सर्वांचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला सायंकाळी पाच वाजता शाहीनबाग येथील आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलक महिलांनी मोदींसाठी एक गाणं गायलं. इतकचं नाही मोदींसाठी एक खास भेटवस्तू म्हणून एक उंच टेडी बेअरही या महिलांनी दिला. शाहीनबाग येथील आंदोलनाला समर्थन करणाऱ्या अनेकांनी सोशल मिडियावर एक पोस्टर शेअर केलं आहे. “पंतप्रधान मोदीजी, कृपया शाहीनबागेत या. तुमची व्हॅलेंटाइन गिफ्ट घेऊन जा, आमच्याशी चर्चा करा,” असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे.

गुरुवारी रात्री मोदींनी आम्हाला भेटायला यावे अशा घोषणा आंदोलकांनी केली. “मोदी तूम कब आओगे… मोदी तूम कब आओगे…” अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. तसेच “दोन महिने होऊनही सरकारपर्यंत आमचे म्हणणे पोहचलेले नाही. त्यामुळेच आम्ही आता प्रेमाने पंतप्रधानांना भेटीचे आमंत्रण पाठवत आहोत,” असं आंदोलकांनी स्पष्ट केलं.

तुम कब आओगे…

#TumKabAaoge हा हॅशटगही आंदोलकांनी ट्विटवर ट्रेण्ड केला आहे. अनेकांनी हा हॅशटॅग वापरुन मोदींना शाहीनबागेत येण्याचे आवाहन केलं आहे.

…तर आंदोलन मागे

आंदोलनकर्त्यांपैकी एक असणाऱ्या तारीस अहमद याने एका अटीवर आम्ही आंदोलन मागे घेण्यास तयार असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह किंवा इतर कोणीही जे इथे येऊ शकतील त्यांनी आम्हाला सध्या जे सुरु आहे ते घटनेच्याविरोधात नाही असं पटवून दिल्यास आम्ही आंदोलन मागे घेऊ. नवीन कायद्यानुसार कोणाला नागरिकत्व दिलेही जात नाही आणि घेतलेही जात नाही असं सरकारतर्फे सांगण्यात येत असलं तरी याचा देशासाठी काय फायदा आहे याबद्दल कोणी काहीच बोलताना दिसत नाही,” असं अहमद म्हणाला.

शाह यांनी दाखवली तयारी…

“सीएएबद्दल कोणतीही शंका असल्याने माझ्या कार्यालयाकडे रितसर भेटीचा वेळ मागून घ्यावा. मी तीन दिवसांच्या आता या कायद्याबद्दल शाहीनबाग येथील आंदोलकांना भेटून चर्चा करेन,” असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे.