निर्भया बलात्कार प्रकरण: आरोपीची आई म्हणते, “एका मृत्यूसाठी पाच जणांना फाशी देण चुकीचं”
आरोपींच्या नातेवाईकांचे न्यायलयासमोर आंदोलन
by लोकसत्ता ऑनलाइनदिल्ली सामूहिक बलात्कार व खून प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या चारही आरोपींच्या नातेवाईकांनी गुरुवारी दिल्लीमध्ये आंदोलन केले. या प्रकरणातील मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनयकुमार शर्मा आणि अक्षय कुमार हे चारही जण निर्दोष असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
“एका मृत्यूसाठी पाच जणांना फाशी चूक”
“या जगात मला माझ्या मुलाशीवाय इतर कोणीच नाहीय. त्यामुळे त्याला एक संधी द्या,” असं मत आरोपी मुकेश कुमारच्या आईने व्यक्त केलं आहे. तर पवन गुप्ताच्या बहिणीनेही आपला भाऊ निर्दोष असल्याचे हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना म्हटलं आहे.”एका व्यक्तीच्या मृत्यूसाठी पाच जणांना फाशी देणं चुकीचं आहे,” असं प्रकरणातील तिसरा आरोपी विनय शर्माच्या आईनेही म्हटलं आहे.
आरोपींच्या नातेवाईकांचे आंदोलन
दिल्लीमधील न्यायलयाबाहेर आरोपींच्या नातेवाईकांनी गुरुवारी आंदोलन केले. या प्रकरणातील चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी करण्यात यावं या मागणीसाठी न्यायलयामध्ये पीडितेच्या पालकांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर १७ फेब्रवारी रोजी सुनावणी होणार आहे.
एकाची आत्महत्या एक अल्पवयीन
पाच आरोपींपैकी प्रमुख आरोपी असणाऱ्या राम सिंग याने २०१३ साली तिहार तुरुंगामध्ये आत्महत्या केली. तर हा गुन्हा करताना अल्पवयीन असणाऱ्या मुलाला काही वर्ष सुधारगृहात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर २०१५ साली त्याला सोडून देण्यात आलं.
शेवटच्या श्वासापर्यंत मदत मिळवण्यास पात्र
शिक्षा सुनावण्यात आलेला दोषी त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कायदेशीर मदत मिळण्यास पात्र असल्याचे सांगून; दिल्ली सामूहिक बलात्कार व खून प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या चारजणांपैकी पवन गुप्ता याला दिल्लीतील एका न्यायालयाने बुधवारी वकील देऊ केला.
न्यायालयात नक्की काय घडलं?
तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी कनिष्ठ न्यायालयासमोर सद्य:स्थिती अहवाल सादर केला. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या सात दिवसांच्या अखेरच्या मुदतीत मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनयकुमार शर्मा आणि अक्षय कुमार या चारही दोषींनी कुठल्याही कायदेशीर मार्गाचा अवलंब केला नसल्याचे त्यात नमूद केले होते. आपण आपल्या पूर्वीच्या वकिलाला हटवले असून, नवा वकील करायला आपल्याला वेळ लागेल असे पवनने न्यायलयाला सांगितले. यावर या विलंबाबाबत न्यायाधीश धमेंद्र राणा यांनी नाखुषी व्यक्त केली. चारही दोषींच्या फाशीच्या अंमलबजावणीसाठी नवी तारीख निश्चित करावी, ही दिल्ली सरकार व तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी केलेली विनंती कनिष्ठ न्यायालयाने ७ फेब्रुवारीला अमान्य केली होती. या चौघांनी त्यांना उपलब्ध असलेल्या कायदेशीर उपायांचा मार्ग चोखाळण्यासाठी त्यांना एक आठवडय़ाची मुदत देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची त्यांनी दखल घेत मुदत वाढवून दिली.
वकीलांची यादी देण्यात आली
जिल्हा न्याय सेवा प्राधिकरणाने पवनच्या वडिलांना निवड करण्यासाठी पॅनेलवरील वकिलांची यादी सोपवली आहे. पवनने या प्रकरणात अद्याप क्युरेटिव्ह याचिका दाखल केलेली नाही. एखाद्या व्यक्तीला उपलब्ध असलेला हा अखेरचा कायदेशीर उपाय आहे. राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याचा पर्यायही त्याला आहे. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर, निर्भयाचे पालक आणि दिल्ली सरकारने चार दोषींच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्याविरुद्ध नव्याने डेथ वॉरंट जारी करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती. याच प्रकरणातील सुनावनी दरम्यान आता आरोपींना १७ तारखेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.