बालाकोटमध्ये फायटर जेटसकडून टार्गेट चूकणं अशक्य होतं, का ते समजून घ्या
बालाकोटमध्ये भारतीय फायटर विमानं आपल्या लक्ष्यापासून चुकण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.
by लोकसत्ता ऑनलाइनपुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालं. या हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. या कारवाईत पाकिस्तानचे अनेक दहशतवादी मारले गेले. पण अजूनही काही जणांच्या मनात बालाकोट एअर स्ट्राइकबद्दल प्रश्नचिन्ह आहे. या हल्ल्यात खरोखर पाकिस्तानचं किती नुकसान झालं? याबद्दल अनेक जण प्रश्न उपस्थित करत असतात. खरंतर बालाकोटमध्ये भारतीय फायटर विमानं आपल्या लक्ष्यापासून चुकण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. कारण इंडियन एअर फोर्सने स्पाइस २००० बॉम्बचा वापर केला होता.
स्पाइस २००० स्मार्ट बॉम्ब लक्ष्य कसे शोधून काढते ?
भारताने बालाकोटमध्ये शत्रूच्या तळावर हल्ला करण्यासाठी स्पाइस २००० अस्त्राचा वापर केला. स्पाइस २००० हा स्मार्ट बॉम्ब असून अत्यंत अचूकतेने लक्ष्याचा वेध घेण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो. स्पाइस २००० ला बॉम्ब म्हटले जात असले तरी हा एक ‘गायडन्स किट’ आहे. म्हणजे ज्याला मार्गदर्शक म्हणता येईल. पारंपरिक वॉरहेड किंवा बॉम्ब जो असतो त्याला स्पाइस २००० किट जोडले जाते. त्यामुळे २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राइकच्यावेळी जो बॉम्ब वापरला गेला तो स्वदेशी बनावटीचा असावा. त्याची निर्मिती भारतातील दारुगोळा कारखान्यामध्ये झाली असावी.
या स्पाइस किटची निर्मिती इस्त्रायलमधल्या कंपनीने केली आहे. या किटमध्ये कॅमेरा, मेमरी चीप आणि जीपीएस असते. ज्याच्या मदतीने लक्ष्यावर अचूक प्रहार करता येतो. एकदा लक्ष्य निश्चित झाले की, या स्मार्ट किटच्या मेमरी चीपमध्ये सर्व माहिती सेट केली जाते. टार्गेटचे जीपीएस लोकेशन, उपग्रहामार्फत घेतलेले फोटो, लक्ष्याच्या आसपास काय आहे त्याची माहिती मेमरी चीपमध्ये सेट केली जाते.
पारंपारिक बॉम्बला हे स्मार्ट किट जोडले जाते. फक्त अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी बॉम्बसोबत हे स्मार्ट किट वापरले जाते. या तंत्राच्या मदतीने काही किलोमीटर अंतरावरुन हवाई दलाला अचूक हल्ला करता येतो. त्यामुळे एअर स्ट्राइकमध्ये टार्गेट मिस होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळेच पाकिस्तानने घटनास्थळी दीडमहिना कोणाला जाऊ दिले नाही. उलट भारतीय हवाई दलाने जंगलात इतक्या आतमध्ये असलेल्या भागात लक्ष्यावर अचूक प्रहार करुन आपली क्षमता दाखवून दिली. दहशतवाद्यांना तुम्ही आमच्यापासून लपवू शकत नाही हेच भारताने आपल्या कारवाईतून सिद्ध केले.