https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/dhote-subhash-rajura-hc_202001363598.jpg
सुभाष धोटे यांची निवडणूक रद्द करा  : हायकोर्टात याचिका

सुभाष धोटे यांची निवडणूक रद्द करा  : हायकोर्टात याचिका

राजुरा येथील काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांची निवडणूक रद्द करण्यात यावी अशा विनंतीसह स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अ‍ॅड. वामन चटप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

by

ठळक मुद्दे

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : राजुरा येथील काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांची निवडणूक रद्द करण्यात यावी अशा विनंतीसह स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अ‍ॅड. वामन चटप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. धोटे यांनी अवैध कृती करून निवडणूक जिंकली असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. न्या. विनय जोशी यांनी शुक्रवारी भारतीय निवडणूक आयोग, धोटे व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून यावर १३ मार्चपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.
धोटे यांनी निवडणुकीच्या नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अ‍ॅट्रॉसिटीसह अन्य काही प्रलंबित गुन्ह्यांची माहिती नमूद केली नाही. कायद्यानुसार उमेदवारांने स्वत:विरुद्धच्या सर्व गुन्ह्यांची माहिती देणे आवश्यक आहे. धोटे यांनी या तरतुदीचे उल्लंघन केले. राजुरा विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातीची लोकसंख्या २३ टक्के आहे. त्यामुळे त्यांनी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा लपवून ठेवला. उमेदवारासंदर्भात माहिती उपलब्ध होणे हा मतदारांचा अधिकार आहे. असे असताना धोटे यांनी बेकायदेशीर कृती केली. परिणामी, त्यांची निवडणूक रद्द करून या मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी असे चटप यांनी याचिकेत म्हटले आहे. चटप यांच्यातर्फे अ‍ॅड. एस. एस. संन्याल तर, निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.