https://images.loksatta.com/2020/01/Team-India-vs-NZ-Superover.jpg?w=830

टी-२० विश्वचषकाआधी टीम इंडियाला शुभ संकेत, सापडला विजयाचा हुकमी एक्का

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत भारताची ४-० ने आघाडी

by

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत सलग दुसऱ्यांदा भारताने सुपरओव्हरमध्ये बाजी मारली. वेलिंग्टनच्या मैदानात मुंबईकर शार्दुल ठाकूरने टाकलेलं शेवटचं षटक आणि फलंदाजीत लोकेश राहुल आणि विराट कोहलीने केलेली आक्रमक फलंदाजी या जोरावर भारताने चौथ्या टी-२० सामन्यात विजय मिळवला. शार्दुल ठाकूरला त्याच्या अखेरच्या षटकासाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

२०२० साली भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं प्रमुख आव्हान असणार आहे. या महत्वाच्या स्पर्धेआधीच, टीम इंडियाला आपल्या विजयाचा हुकमी एक्का सापडला आहे. हा एक्का दुसरा-तिसरा कोणीही नसून मधल्या फळीतला गुणवान खेळाडू मनिष पांडे आहे. चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाच्या विजयात मनिष पांडेनेही महत्वाची भूमिका बजावली. ३६ चेंडूत मनिषने ५० धावा केल्या. महत्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ज्या १८ सामन्यांमध्ये मनिष पांडेला अंतिम ११ जणांत जागा मिळाली आहे, तो प्रत्येक सामने भारताने जिंकला आहे.

याचसोबत नवीन वर्षात टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून भारताची सुरुवातही चांगली झालेली आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहाही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे.

https://images.loksatta.com/2020/01/Manish-Pandey-in-Nets.jpg

पहिल्या डावात मनिष पांडेच्या नाबाद अर्धशतकी खेळामुळे भारताने आव्हानात्मक धावसंख्या गाठली

दरम्यान या मालिकेतला अखेरचा सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकल्यास भारताला न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. टी-२० मालिकेनंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध ३ वन-डे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : पांडेजी चमकले! रैना-धोनीला टाकलं मागे