पुढील आदेशांपर्यंत निर्भयाच्या दोषींची फाशी टळली
दिल्ली कोर्टाने काही वेळापूर्वीच दिला निर्णय
by लोकसत्ता ऑनलाइनपुढील आदेशापर्यंत निर्भयाच्या दोषींची फाशी टळली आहे. दिल्ली कोर्टाने या संदर्भातला निर्णय दिला आहे. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार होती. मात्र आज दिल्ली कोर्टाने यासंदर्भातला निर्णय दिला आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
१ फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासंबंधीचे डेथ वॉरंट काढण्यात आले होते. निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची तयारी पूर्ण झाल्याचे तिहार तुरुंग प्रशासनाने स्पष्टही केले होते. मात्र फाशी पुढे ढकलण्यासंदर्भात पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तिहार तुरुंग प्रशासनाच्या वतीने इरफान अहमद पटियाला हाऊस कोर्टात हजर झाले.
निर्भया प्रकरणातील चारपैकी विनय शर्माची याचिका प्रलंबित आहे. इतर तिघांना फाशी दिली जाऊ शकते. विनय शर्माच्या प्रकरणाचा अपवाद वगळता इतर कोणतेही प्रकरण न्यायप्रविष्ट नाही. या याचिकेवर सुनावणी सुरु असताना दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. ज्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान काही वेळापूर्वीच पुढील आदेशांपर्यंत दोषींना फाशी देण्यात येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.
काय आहे निर्भया प्रकरण?
१६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा अत्यंत क्रूर पद्धतीने लैंगिक छळही करण्यात आला. या अत्याचारामुळे निर्भयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या जखमांशी झुंज देत उपचार घेत असताना निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती.