https://images.loksatta.com/2020/01/Virat-Kohli-1-2.jpg?w=830

Ind vs NZ: थरारक विजयानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया

सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा न्यूझीलंडचा पराभव केला असून ४-० ची आघाडी घेतली आहे

by

सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा न्यूझीलंडचा पराभव केला असून ४-० ची आघाडी घेतली आहे. शार्दूल ठाकूरची भेदक गोलंदाजी आणि सोबत के एल राहुल, विराट कोहलीने सुपर ओव्हरमध्ये केलेल्या फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर थरारक विजय मिळवला. सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विराट कोहलीने ट्विट करत म्हटलं आहे की, “प्रत्येक आव्हान आम्ही पार पाडत आहोत. व्हॉट अ गेम”

ऐनवेळी विराट कोहली सुपर ओव्हरसाठी मैदानात उतरला
त्याआधी सामना संपल्यानंतर विराट कोहलीने बोलताना सांगितलं की, “मी गेल्या काही सामन्यांमधून एक नवीन गोष्ट शिकली आहे. ती म्हणजे जेव्हा विरोधी संघ चांगला खेळत असतो तेव्हा तुम्ही शांत राहून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यापेक्षा रोमांचक खेळ असू शकत नाही. याआधी आम्ही सुपर ओव्हर खेळलेलो नाही आणि आता आम्ही दोन जिंकलो आहोत. यातून तुमचा खेळ दिसतो. सुरुवातीला आम्ही सुपर ओव्हरसाठी संजू सॅमसन आणि के एल राहुलला पाठवणार होतो. पण के एल राहुलला अनुभवी असल्याने मला फलंदाजी करण्याचा सल्ला दिला. म्हणून मग मी फलंदाजीसाठी उतरलो”.

अखेरच्या षटकांत शार्दुल ठाकूरने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर सलग दुसऱ्या सामन्यात भारताने सुपरओव्हरवर विजय मिळवला. तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत थरारक विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने पुन्हा एकदा अगदी तशीच कामगिरी करुन दाखवली.

वेलिंग्टनच्या मैदानावर भारताने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ निर्धारीत षटकांमध्ये १६५ धावांपर्यंतच मजल मारु शकला. यानंतर सुपरओव्हरमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा १४ धावांचं आव्हान सहज पार करत विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे.

जसप्रीत बुमराहने सुपरओव्हरचं षटक टाकताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर चांगला अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. टीम सेफर्टला माघारी धाडण्यात भारताला यशही आलं, तरीही मुनरो व इतर फलंदाजांनी फटकेबाजी करत भारतासमोर १४ धावांचं आव्हान ठेवलं. प्रत्युत्तरादाखल भारताकडून लोकेश राहुलने फटकेबाजी करत पहिल्या दोन चेंडूंमध्येच १० धावा केल्या. तिसऱ्या चेंडूवर फटकेबाजी करण्याच्या नादात राहुल माघारी परतला. मात्र विराट कोहलीने संजू सॅमसनच्या साथीने विजयी लक्ष्य पार करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.