Meena सोबत मारा मनसोक्त गप्पा, Google ची नवी सेवा
गप्पा मारायला कोणी नाही... एकटं एकटं वाटतंय... व्हॉट्सअपचाही वीट आलाय... अन् कोणीतरी आपल्याशी हवं तेवढ्या वेळ गप्पा माराव्यात, असं वाटत असेल तर...
by लोकसत्ता ऑनलाइनगप्पा मारायला कोणी नाही… एकटं एकटं वाटतंय… व्हॉट्सअपचाही वीट आलाय… अन् कोणीतरी आपल्याशी हवं तेवढ्या वेळ गप्पा माराव्यात, असं वाटत असेल तर आता एक नवा पर्याय आला आहे… एक नवं डिव्हाइस येतंय.
अॅमझॉन अॅलेक्सा, गुगल असिस्टंट आणि अॅपल सीरी यांसारखे व्हॉइस असिस्टंट अॅप आधीच खूप लोकप्रिय झालेत. त्यांचा वापर हवामानाची माहिती, बातम्या आणि गाणी ऐकण्याशिवाय अन्य माहिती जाणून घेण्यासाठीही केला जातोय. पण त्यांच्याशी गप्पा मारणं तितकं मजेशीर नाहीये, असा वापरकर्त्यांचा अनुभव आहे. हेच लक्षात घेऊन आता दिग्गज टेक कंपनी Google ने नवीन चॅटबॉट ( बोलणारा असिस्टंट) आणलाय. याचं नाव Meena आहे. Meena सोबत तुम्ही मनसोक्त गप्पा मारु शकता, हा चॅटबॉट तुम्हाला मानवाप्रमाणेच उत्तर देईल. असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय.
Meena ला शिकवले 40 अब्ज शब्द-
टेक्नॉलॉजी वेबसाइट Venture Beat च्या रिपोर्टनुसार, Meena एक विचारांचं महाजाल आहे. यामध्ये जवळपास 2.6 बिलियन पर्याय आहेत. गुगलनुसार, Meenaची अनेक सोशल मीडिया चॅटच्या आधारे निर्मिती करण्यात आली असून Meenaसोबत जवळपास कोणत्याही विषयावर बोलता येईल. Meena तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जोक ऐकवेल. मात्र सामान्य युजर्ससाठी Meena कधीपर्यंत उपलब्ध होईल, याबाबत गुगलने माहिती दिलेली नाही. Meena ला जवळपास 40 अब्ज शब्द शिकवण्यात आले आहेत.
अन्य कोणत्याही चॅटबॉटपेक्षा बेस्ट, गुगलचा दावा –
अन्य कोणत्याही चॅटबॉटपेक्षा Meena उत्तम असल्याचा दावा गुगलने केलाय. Meena कोणत्याही विषयावर बोलेल, असा दावाही कंपनीने केलाय. गुगलच्या तज्ज्ञांनुसार, Meena मध्ये सिंगल इवॉल्वड ट्रांसफॉर्मर इनकोडर आणि 13 इवॉल्वड ट्रांसफॉर्मर डीकोडर ब्लॉक्स दिलेत. याचा अर्थ सिंगल इनकोडर Meena ला बोलणं समजावण्यात मदत करतो, तर 13 डीकोडर उत्तर देण्यासाठी मदत करतो. गुगलच्या शोधकर्त्यांनी Meena ला टेस्ट करण्यासाठी एक मापदंडही तयार केला असून ‘सेन्सिबलनेस अँड स्पेसिफिसिटी अॅव्हरेज’ (SSA) नाव दिलंय. म्हणजेच, Meena कोणत्या प्रश्नांना कशाप्रकारे उत्तरं देतेय, गप्पा मारताना कोणत्या भावनांवर भर देते आणि योग्य उत्तर कसे देते हे या टेस्टमधून तपासण्यात येते. याद्वारे कोणत्याही गप्पांमध्ये दिलेल्या उत्तराच्या आधारे क्रमांक दिला जातो. SSA टेस्टमध्ये मानवांची रँकिंग सामन्यतः 86 टक्के येते. या टेस्टमध्ये Meena ला 79% गुण मिळाले. ही गुगलची स्वतःची पद्धत आहे. अन्य कंपन्या AI-आधारित असिस्टंटच्या बातचितची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध पद्धती अवलंबतात.