करीनामुळे तैमुर बिघडतोय- सैफ अली खान
या मुलाखतीत सैफने तैमुरच्या मनमानी स्वभावाबद्दल सांगितलं.
by लोकसत्ता ऑनलाइनबॉलिवूड इंडस्ट्रीमधला सर्वांत लाडका स्टारकिड म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमुर. सैफ-करीना कुठेही गेले तरी चर्चा मात्र तैमुरचीच असते. आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत सैफला तैमुरबद्दल आवर्जून प्रश्न विचारला गेला. तैमुर घरी कसा वागतो याबद्दल विचारले असता सैफने त्याच्या मनमानी स्वभावाबद्दल सांगितलं.
“तैमुरशी मी थोडं कडक वागायला पाहिजे असं मला वाटतं. कारण घरात तो फार मनमानी करू लागला आहे. मात्र करीना त्याला बिघडवतेय आणि तिच्यामुळे त्याला खतपाणी मिळतंय. तैमुरला करीनाचा वचक नाही,” असं तो म्हणाला. तैमुर शाळेत न जाण्याबाबतही हट्ट करत असल्याचं सैफने यावेळी सांगितलं. सैफ पुढे म्हणाला, “तैमुर फार गोड आहे. पण त्याला जर एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हटलं तर तो चिडतो. मी तुम्हाला मारीन, तुमचं डोकं फोडीन असं तो म्हणतो.”
सैफ आणि करीना लवकरच तैमुरसोबत एका जाहिरातीत झळकणार असल्याचीही चर्चा आहे. या जाहिरातीसाठी सैफ-करीनाने कोट्यवधी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात होतं. सैफचा ‘जवानी जानेमन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षक-समिक्षकांकडून त्याला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात सैफसोबत अलाया फर्निचरवाला आणि तब्बू महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.