https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/aisf55_202001363576.jpg
पोलिसांची बंदी झुगारून मुंबईत उद्या राज्य अधिवेशन घेणारच; ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशनचा निर्धार

पोलिसांची बंदी झुगारून मुंबईत उद्या राज्य अधिवेशन घेणारच; ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशनचा निर्धार

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) या विद्यार्थी संघटनेचे १५वे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवार १ फेब्रुवारी आणि रविवार २ फेब्रुवारी रोजी मुंबईतील पी. डिमेलो भवन येथे आयोजित करण्यात आले होते

by

मुंबई : भारतातील देश पातळीवरील पहिली विद्यार्थी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) या विद्यार्थी संघटनेचे १५वे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवार १ फेब्रुवारी आणि रविवार २ फेब्रुवारी रोजी मुंबईतील पी. डिमेलो भवन येथे आयोजित करण्यात आले होते. पण या भवनची जागा केंद्राच्या अधिपत्याखालील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत येत असून, केंद्र सरकार आणि पोलिसांनी संस्थाचालकांवर दबाव आणून या अधिवेशनाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थाचालकही या दबावाला व दडपशाहीला बळी पडले असल्याने अधिवेशनाच्या पूर्वनियोजित स्थळालाही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या आणि पोलिसांच्या या कृतीचा निषेध करत, पोलिसांची बंदी झुगारून मुंबईत अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन (एआयएसएफ)ने केला आहे. याबाबतची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष कॉ. पंकज चव्हाण आणि राज्यसचिव कॉ. सागर दुर्योधन यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

या पत्रकात पुढे म्हटले आहे, की संघटनेने आता प्रभादेवी येथील भुपेश गुप्ता भवन येथे हे दोन दिवसीय अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार अधिवेशनाचे उदघाटन शनिवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता अपना बाजारचे संस्थापक गजानन खातू यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री आणि समाजवादी कार्यकर्त्या उर्मिला मातोंडकर, सीएएच्या विरोधात राजीनामा दिलेले आय.पी.एस. अधिकारी अब्दुल रहेमान, आरे बचाव आंदोलनातील कार्यकर्ते स्टॅलिन दयानंद, ए.आय.एस.एफ.चे राष्ट्रीय महासचिव कॉ. विकी महेश्वरी, माजी राष्ट्रीय महासचिव कॉ. अभय टाकसाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार असून, या मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातुन शेकडो विद्यार्थी प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

उदघाटन सत्रानंतर मुंबई विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी उभारलेल्या रंग आंदोलनाबाबतची सविस्तर चर्चा या ठिकाणी केली जाणार आहे. तसेच अशफाकराम या नाट्यप्रयोगाचे आणि विद्रोही कवितांचे सादरीकरणही यावेळी केले जाणार आहे. रविवार २ फेब्रुवारी रोजी प्रतिनिधी सत्र होणार असून, यामध्ये संघटनात्मक व राजकीय अहवालावर चर्चा केली जाणार आहे. तसेच विविध शैक्षणिक ठराव मांडले जाणार असल्याचे कॉ. चव्हाण आणि कॉ. दुर्योधन यांनी सांगितले आहे.