https://images.loksatta.com/2020/01/tree.jpg?w=830
trees shed their leaves

हिवाळ्यामध्येच झाडाची पाने का गळून पडतात, तुम्हाला ठाऊक आहे का?

हिवाळ्यात पानगळ का होते, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

by

प्रश्न:
हिवाळ्यात पानगळ का होते?

उत्तर:
हिवाळा (शिशिर ऋतू) सुरू झाला की वातावरणातील तापमान कमी होते. वृक्षांची वाढ मंदावते. पानांमधील हरितद्रव्य कमी होते, प्रकाशसंप्रेषण मंदावते. हरितद्रव्य [क्लोरोफिल]  कमी झाल्यामुळे पिवळ्या रंगाचे  झान्थोफिल्स, नारंगी रंगाचे कॅरेटेनॉइड्स, लाल जांभळ्या रंगाचे अँथोसायनीन इत्यादी रंगद्रव्ये वाढतात. म्हणून पानगळ होताना झाडांच्या पानांच्या रंगामध्ये बदल दिसून येतात. हरितद्रव्य कमी होण्याची सुरुवात पानांच्या देठातील पेशींपासून होते. देठातील या पेशींच्या थरामध्ये सबइरीन आणि लीगनिन स्र्वले जाते. या पदार्थांचा थर ते पान फांदीपासून वेगळे होण्यास मदत करतो. या प्रRियेत वनस्पतीमधील संप्रेरके जसे ऑक्झीन, इथिलीन, व अ‍ॅबसिसिक अ‍ॅसिड  यांच्या महत्त्वाच्या भूमिका असतात. पानझडीच्या वृक्षांमध्ये हिवाळ्यात पानगळ दिसते तर सदाहरित वृक्षांमध्ये सर्व ऋतूत पानगळ दिसते. पानगळीप्रमाणे वनस्पतीमध्ये फुलांची, पिकलेल्या फळांची, काही फांद्यांचीसुद्धा गळती दिसून येते. वसंत ऋतूमध्ये होऊ  घातलेल्या बदलांसाठी पानगळ होते, तर फुलांमध्ये फलनानंतर फळं तयार होताना फुलांच्या पाकळ्या, निदलपुंज इ. ची गळती दिसून येते तसेच फळ पिकल्यानंतर, फांद्यांमध्ये झालेल्या वाईट बदलांमुळे त्यांच्यात गळती दिसते. पानगळीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अन्नद्रव्यांची साठवण आणि वसंत ऋतूमध्ये सुरू होणाऱ्या फुलांचा बहर आणि पर्यायाने फळधारणा हा आहे. काही वनस्पतींमध्ये पानगळीनंतर फुले येतात, ती फुले कीटकांना पटकन दिसतात, त्यामुळे अशा वनस्पतींमध्ये कीटकांद्वारे परागीभवन यशस्वीरीत्या पार पडते.

– डॉ. मनीषा कर्पे (मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग)