https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/new-zealand_202001363558.jpg
सुपर ओव्हरविरोधात उद्या न्यूझीलंड बंद; क्रिकेटप्रेमी उतरणार रस्त्यावर

सुपर ओव्हरविरोधात उद्या न्यूझीलंड बंद; क्रिकेटप्रेमी उतरणार रस्त्यावर

सुपर ओव्हर रद्द करण्याची क्रिकेट चाहत्यांची मागणी; उद्या देशभरात निदर्शनं

by

टीम इंडियाविरुद्ध सलग दुसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागल्यानं न्यूझीलंडमधले क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत. गेल्या दोन टी-२० सामन्यात न्यूझीलंडनं तोडीस तोड खेळ केला. मात्र शेवटच्या षटकांमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी केलेल्या चुकांमुळे दोन्ही सामने सुपर ओव्हरमध्ये गेले. या दोन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंड पराभूत झाल्यानं सुपर ओव्हरविरोधात उद्या क्रिकेट चाहते रस्त्यावर उतरणार आहेत. 

(ही पूर्णपणे काल्पनिक बातमी आहे. थोडीशी गंमत, निव्वळ मनोरंजन करणं हाच त्यामागचा हेतू आहे.)

क्रिकेट चाहत्यांनी न्यूझीलंड बंदची हाक दिल्यानं देशातली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्टेडियम आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आयसीसीनं सुपर ओव्हर बंद करावी, ही क्रिकेट चाहत्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी न्यूझीलंडमधल्या क्रिकेट चाहत्यांचं शिष्टमंडळ आयसीसीच्या प्रमुखांची भेट घेण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड सरकारनंदेखील यासाठी पुढाकार घ्यावा, अशी क्रिकेट रसिकांची आग्रही मागणी आहे.

न्यूझीलंडच्या मानगुटीवर 'Super Over'चं भूत; पाहा कधी व कोणी केलं पराभूत

न्यूझीलंडचे क्रीडा मंत्री ग्रँट रॉबर्टसन यांनी २९ जानेवारीला सुपर ओव्हरविरोधात एक ट्विट केलं होतं. 'मानसिक स्वास्थ आणि भल्यासाठी (सुपर ओव्हरवर बंदी) विधेयक तातडीनं सादर करण्यात येईल,' असं रॉबर्टसन यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. क्रीडा मंत्र्यांनी आता त्यांचे शब्द खरे करून दाखवायची गरज आहे. निव्वळ ट्विट करण्यापेक्षा कृती करा, अशी मागणी क्रिकेट रसिक करू लागले आहेत.

सुपर ओव्हरचा नियम आयसीसीनं केला असल्यानं त्याला आव्हान कसं द्यायचं असा प्रश्न न्यूझीलंड क्रिकेट बोर्डासमोर पडला आहे. त्यावरही न्यूझीलंडच्या क्रिकेट चाहत्यांनी एक वेगळाच पर्याय क्रिकेट बोर्डाला दिला आहे. भारतीय संसदेत सुधारित नागरिकत्व विधेयक मंजूर होऊनही अनेक राज्यांनी त्यांच्या विधानसभांमध्ये कायद्याविरोधात ठराव मंजूर केले. त्याच पद्धतीनं सुपर ओव्हरविरोधात न्यूझीलंडमध्ये ठराव मंजूर करावा, अशी आग्रही मागणी क्रिकेट चाहत्यांनी केली आहे.

IND Vs NZ: सुपर ओव्हरवर बंदी आणा, न्यूझीलंडच्या क्रीडा मंत्र्यांनी केली अजब मागणी

सुपर ओव्हरविरोधातलं आंदोलन सुरू असताना न्यूझीलंडमध्ये भारताचे गृहमंत्री अमित शहादेखील चर्चेत आले आहेत. सात दशकांपासून जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम ३७० हटवण्याची हिंमत शहा दाखवू शकतात. मग क्रीडामंत्री ग्रँट रॉबर्टसन ठाम भूमिका घेऊन सुपर ओव्हरचं कलम रद्द का करू शकत नाहीत?, असा सवाल क्रिकेट चाहत्यांनी उपस्थित केला आहे. सुपर ओव्हर रद्द करा अन्यथा राजीनामा द्या, अशी भूमिका चाहत्यांनी घेतल्यानं रॉबर्टसन यांची खुर्ची धोक्यात आली आहे.