https://images.loksatta.com/2020/01/Jalna.jpg?w=830

जालन्यात टोळक्याची प्रेमी युगुलाला बेदम मारहाण, मुलीची कॉलर पकडून फरफटत नेलं; कारवाईचे आदेश

जालन्यात एका प्रेमी युगुलाला मारहाण होत असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे

by

जालन्यात एका प्रेमी युगुलाला मारहाण होत असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेची दखल घेतली असून आरोपींवर लवकरात लवकर कडक कारवाई होणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच व्हायरल व्हिडिओ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

अनिल देशमुख यांनी घटनेवर ट्विट करत सांगितलं आहे की, “जालन्यात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे याचा व्हिडिओ व्हायरल होत होता त्याला थांबवण्याचे आदेश दिले गेलेले आहे. तसेच आरोपींवर लवकरात लवकर कडक कारवाई होणार”.

या व्हिडीओत काहीजण मिळून दोघांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर टोळक्यातील तरुण तरुणीला कॉलर पकडून फरफटत नेत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे दोघं वारंवार विनंती करत असूनही त्यांना मारहाण केली जात आहे. तरुण आम्ही चुकीचं काही केलं नाही. इथे तळं होतं म्हणून आलो. दादा प्लीज, यानंतर नाही होणार असं सांगत गयावया करताना दिसत आहे. टोळक्यातील तरुण मात्र कोणतीही दया दाखवत नाहीत. उलट तरुणीच्या वडिलांना बोलाव असं सांगत आहेत. तरुण त्यांच्यासमोर रडू लागल्यानंतर रडू नको आम्ही माजलेली डुकरं आहोत असंही ते सांगताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याबद्दल अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पोलीस सध्या व्हिडीओतील प्रेमी युगुलाचा तसंच मारहाण करणाऱ्या टोळक्याचा शोध घेत आहेत.