https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/v.-n.-utpat22112_202001363541.jpg
हिंदू धर्म आणि वेदांवर टीका करणे सध्याचे पुरोगामित्वाचे लक्षण : वा.ना उत्पात

हिंदू धर्म आणि वेदांवर टीका करणे सध्याचे पुरोगामित्वाचे लक्षण : वा.ना उत्पात

भगवदगीता तोंडपाठ आहे असे म्हणणाऱ्या पुढाऱ्याला एक श्लोकही व्यवस्थितपणे म्हणता आला नाही हे आपण सर्वांनीच पाहिले आहे,

by

ठळक मुद्दे

पुणे : हिंदू धर्म आणि वेदांवर टीका करणे हे सध्याच्या काळात पुरोगामित्वाचे लक्षण झाले आहे, असे भाष्य करीत, भगवदगीता तोंडपाठ आहे असे म्हणणाऱ्या पुढाऱ्याला एक श्लोकही व्यवस्थितपणे म्हणता आला नाही हे आपण सर्वांनीच पाहिले आहे, अशी टिप्पणी भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी त्यांनी केली. 
श्री देवदेवेश्वर संस्थानतर्फे गणेश जयंती उत्सवानिमित्त ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक किसन महाराज साखरे यांच्या हस्ते पूर्णवादाचे अभ्यासक विष्णू महाराज पारनेरकर आणि भागवताचार्य वा. ना.उत्पात यांना श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी उत्पात बोलत होते. संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, डॉ. उदयसिंह पेशवे, सुधीर पंडित या वेळी उपस्थित होते. 
उत्पात म्हणाले, पेशव्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे. हा पुरस्कार मी माझे गुरु अनंतराव आठवले ऊर्फ वरदानंद भारती यांच्या स्मृतीस अर्पण करतो. सावरकर विचारांचा पाईक असूनही हिंदू  धर्माचा मी अभिमानी आहे. 
पारनेरकर म्हणाले, देवाची पूजा आणि भक्ती करण्याची विद्या समजून घेतली पाहिजे. अन्यथा ती अंधश्रद्धा ठरेल. ज्ञान हे व्यक्तीपरत्वे वेगळे असते. मात्र, विद्या गुरुने शिकविल्यानंतरच प्राप्त होते. 
साखरे म्हणाले, मानवी जीवनात दानाला विशेष महत्त्व आहे. माणूस कितीही मोठा झाला तरी दैवी संपत्तीने मोठा होणे महत्त्वाचे आहे. माणसाने निर्मत्सर व्हावे हेच ज्ञानेश्वरीने सांगितले आहे.
भागवत यांनी प्रास्ताविक केले. पंडित यांनी आभार मानले. अदिती अत्रे यांनी सूत्रसंचालन केले.