https://images.loksatta.com/2020/01/coronavirus.jpg?w=830

Coronavirus: जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणजे काय?

कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे.

by

चीनमधून सर्वत्र फैलाव होत असलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत २१३ जणांचा मृत्यू झाला आहे. १० हजार जणांना या विषाणूची लागण झाली आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे.

जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणजे नेमके काय?

– एखादा आजार जेव्हा जगभरात पसरण्याचा धोका असतो. ज्या आजारामुळे मोठया प्रमाणात जागतिक आरोग्य व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेकडून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली जाते.

– सर्वत्र वेगाने फैलावणाऱ्या आजाराचा सामना करण्यासाठी, रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असते. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून आराखडा तयार केला जातो.

– WHO कडून आणीबाणी जाहीर झाल्यानंतर सर्वच सदस्य देशांकडून विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी विशेष तयारी सुरु होते.

– अशा प्रकारच्या इमर्जन्सीसाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून निधी बाजूला काढला जातो.

– जागतिक आरोग्य संघटनेकडून आतापर्यंत कोरोना विषाणूचा प्रसार झालेल्या भागांमध्ये १८ लाख डॉलर्सचे वाटप करण्यात आले आहे. WHO कडे विविध देशांकडून जमा झालेला पैसा असतो. आपतकालीन स्थितीत आजाराचा फैलाव रोखण्यासाठी निधीचे वाटप करण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेचे १९६ सदस्य देश असून, कायदेशीर दृष्टया त्यांना काही गोष्टींचे पालन करणे बंधनकारक आहे.

– जागतिक आरोग्य आणीबाणीमध्ये प्रवासाशी संबंधितही काही शिफारशींचा समावेश होतो. यामध्ये देशांच्या सीमांवर, आंतरराष्ट्रीय विमातळावर उतरल्यानंतर आरोग्य तपासणी केली जाते.

– संघटनेकडून कधीही ज्या देशामध्ये आजाराचे मूळ आहे, तिथे प्रवास बंदीचा सल्ला दिला जात नाही.

– पूर्व आफ्रिकेमधून निर्मिती झालेल्या इबोलाच्यावेळी सुद्धा जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी घोषित केली होती. इबोलामुळे आतापर्यंत ३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.