Ind vs Eng Women’s T20I : भारताचा विजय, ५ विकेट राखून जिंकला सामना
कर्णधार हरमनप्रीतची निर्णयाक खेळी
by लोकसत्ता ऑनलाइनहरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने तिरंगी मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय महिलांनी ५ फलंदाज राखून विजय मिळवला. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं १४८ धावांचं आव्हान भारतीय महिलांनी कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नाबाद आक्रमक खेळाच्या जोरावर पूर्ण केलं.
नाणेफेक जिंकून भारतीय महिलांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिलांनी आपल्या कर्णधारा निर्णय सार्थ ठरवत सुरुवातीच्या षटकांमध्ये इंग्लंडला ३ धक्के दिले. एमी जोन्स, डॅनी वेट आणि नतालिया स्किवर या तीन फलंदाज झटपट माघारी परतल्या. यानंतर मधल्या फळीत कर्णधार हेदर नाईट आणि टॅमी बेमाऊंट यांनी महत्वपूर्ण खेळी करत इंग्लंडला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. हेदर नाईटने ६७ तर बेमाऊंटने ३७ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून राजेश्वरी गायकवाड-शिखा पांडे आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. राधा यादवने १ बळी घेतला.
प्रत्युत्तरादाखल भारतीय महिलांनी आपल्या डावाची सुरुवात सावध पद्धतीने केली. नतालिया स्किवरने स्मृती मंधानाला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर शेफाली वर्मा आणि जेमायमा रॉड्रीग्ज यांनी दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी रचली. हेदर नाईटने शेफाली वर्माला तर कॅथरिन ब्रंटने रॉड्रीग्जला बाद करत भारताला धक्के दिले. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने मैदानात येत संघाचा डाव सावरला. ३४ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने हरमनप्रीतने नाबाद ४२ धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडकडून कॅथरिन ब्रंटने २, सोफी एस्कलस्टोन-नतालिया स्किवर आणि हेदर नाईट यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.