टूथब्रशच्या जन्माची कथा आणि इतिहास ठाऊक आहे का?
टूथब्रश सर्वात प्रथम वापरण्यात आला तो चीनमध्ये
by लोकसत्ता ऑनलाइनसकाळी उठल्याबरोबर आपल्या दिनचर्येची सुरुवातच होते दंतसफाईने. हातात जोपर्यंत टूथब्रश येत नाही, तोपर्यंत आपल्यालाही फ्रेश वाटत नाही आणि उत्तम आरोग्यासाठी नियमित दात घासणे आवश्यकही आहे. दात घासण्याचा ब्रश ही एक लहानशी वस्तू असली तरी तिला अनेक वर्षांचा इतिहास आहे.
मानवी शरीराच्या स्वच्छतेत दातांची सफाईही महत्त्वाची आहे हे मानवाला अगदी प्राचीन काळापासून ज्ञात झाले. अगदी प्राचीन काळापासून मानव विविध पद्धतींचा वापर करून दंतसफाई करत असे. विविध चूर्ण, प्राण्यांच्या हाडाची भुकटी, चुलीतील राख, मीठ अशा विविध प्रकारच्या पदार्थाचा वापर दात घासण्यासाठी केला जाई. युरोप आणि आशियाई देशांमध्ये फार पूर्वीपासूनच कडुनिंब किंवा बाभळीच्या डहाळय़ांचा लहानसा तुकडा दात घासण्यासाठी वापरला जात असे. मात्र आपण सध्या वापरतो, तशा प्रकारचा टूथब्रश सर्वात प्रथम वापरण्यात आला आपले शेजारी राष्ट्र असलेल्या चीनमध्ये, तोही सातव्या शतकात. प्राण्याच्या हाडाच्या तुकडय़ाला घोडय़ाच्या शेपटीचे केस चिकटवून हे ब्रश तयार केले जात असे. जपानमधील झेन फकीर डोगान कायगन हे चीनच्या दौऱ्यावर आले असताना त्यांना चीनमधील बौद्ध भिक्खू या आगळय़ावेगळय़ा ब्रशचा वापर दातांच्या सफाईसाठी करत असल्याचे आढळले. ही घटना आहे १२२३मधील. कायगन यांनी आपल्या पुस्तकात त्याची नोंद केली आहे. पुढे काही फिरस्त्यांमार्फत हे चिनी टूथब्रश युरोपमध्ये पोहोचले आणि घोडय़ांच्या केसांपासून तयार करण्यात आलेल्या या ब्रशचा वापर युरोपमध्येही मोठय़ा प्रमाणात होऊ लागला. (इंग्रजीमध्ये टूथब्रश हा शब्द सर्वप्रथम अँथोनी वूड यांनी आणला. आपल्याला जे. बॅरट यांनी टूथब्रश भेट म्हणून दिल्याचा उल्लेख त्यांनी १६९०मध्ये लिहिलेल्या आत्मचरित्रात केला आहे.)
युरोपमध्ये टूथब्रशचा वापर सुरू असतानाच या वस्तूचा उद्योग केला पाहिजे, अशी सुपीक कल्पना आली ब्रिटनच्या विल्यम एडिस या उद्योगी माणसाच्या डोक्यात. विशेष म्हणजे ही भन्नाट कल्पना या पठ्ठय़ाला सुचली तुरुंगात. एका दंगली प्रकरणात विल्यमसाहेबाला कारावासाची शिक्षा झाली होती. कारागृहात दात घासण्यासाठी देण्यात येणाऱ्या मिठाने त्याचे समाधान होईना. आपल्या दातांच्या सफाईसाठी काही तरी परिणामकारक वस्तू पाहिजे असे त्याच्या मनात आले. चीनमधून युरोपात आलेल्या टूथब्रशबद्दल त्याला माहिती होती. तुरुंगात मासांहारी जेवणावर ताव मारताना त्याने एक हाडूक बाजूला काढून ठेवले. एका सुरक्षारक्षकाकडून प्राण्यांचे केस मिळवले आणि ते या हाडाला घट्ट बांधून टूथब्रश बनवला. तुरुंगातून सुटका झाल्यावर मात्र टूथब्रशनिर्मितीचा उद्योग करायचाच, असे त्याने मनावर घेतले आणि १७८०मध्ये हार्टफोर्डच्या वेअर रोडवर उभी राहिली ‘एडिस फॅक्टरी.’ एडिसच्या या कंपनीने युरोपमधील बाजारपेठा काबीज केल्या आणि टूथब्रशच्या निर्मितीतून बक्कळ पैसा कमावला. १८४०पर्यंत इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि जपानमध्ये याच कंपनीचे टूथब्रश विकले जात असे.
मात्र टूथब्रशचे सर्वप्रथम पेटेंट मिळवले ते अमेरिकेच्या एच. एन. वॉड्सवर्थ यांनी १८५७मध्ये. मात्र १८८५पर्यंत अमेरिकेत टूथब्रशची फारसी विक्री झाली नाही. प्राण्यांच्या हाडांपासून रोगजंतू प्रसारित होण्याची भीती असल्याने अमेरिकेत टूथब्रश बनवण्यासाठी लाकूड आणि हस्तीदंताचा वापर करण्यात आला. पुढे १९३८मध्ये डयूपॉण्ट या कंपनीने टूथब्रश बनवण्यासाठी फायबरचा वापर केला. विशेष म्हणजे या ब्रशला प्राण्यांच्या केसांऐवजी नॉयलॉनचे तंतू त्यांनी वापरले आणि हा ब्रश खूपच लोकप्रिय झाला. सध्या दंतसफाईचे महत्त्व साऱ्यांनाच पटले असल्याने टूथब्रशचा वापर न करणारा माणूस विरळाच.
नेपोलियन बोनापार्ट वापरत असलेला ब्रश. जो घोडय़ांच्या केसांपासून बनविण्यात आला होता.
– संदीप नलावडे
sandeep.nalawade@expressindia.com