Coronavirus: चीनमध्ये अडकले शेकडो भारतीय विद्यार्थी, सुटकेसाठी रवाना होणार AIR INDIA चे विशेष विमान
दिल्लीहून वुहानला रवाना होणाऱ्या या विमानात चार वैमानिक, १५ केबिन क्रू सदस्य असतील.
by लोकसत्ता ऑनलाइनभारत सरकारने वुहानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याची व्यवस्था केली आहे. एअर इंडियाचे बोईंग ७४७ हे विशेष विमान १२ वाजून ५० मिनिटांनी दिल्लीहून वुहानला रवाना होणार आहे. हे जम्बो जेट मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी नऊ वाजता निघाले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या पाच डॉक्टरांची टीम आणि आवश्यक औषधे या विमानामधून पाठवण्यात येणार आहेत. वुहान हे कोरोना विषाणूच्या फैलावाचे मुख्य केंद्र आहे. वुहानमध्ये २५० भारतीय विद्यार्थी अडकले आहेत.
हे विमान खास का आहे ?
दिल्लीहून वुहानला रवाना होणाऱ्या या विमानात चार वैमानिक, १५ केबिन क्रू सदस्य, तीन इंजिनिअर, पाच कर्मचारी, दोन सुरक्षा अधिकारी असा एकूण ३३ जणांचा कर्मचारी वर्ग असेल. या विशेष विमानात कॅप्टन अमिताभ सिंह यांच्याकडे पर्यवेक्षकपदाची जबाबदारी आहे. कोरोना विषाणूची लागण रोखण्यासाठी विमानातील सर्व स्टाफाला विशेष सूट देण्यात आला आहे. वुहानमध्ये विमानाचे दरवाजे उघडण्याआधी या सर्वांनी विशेष सूट परिधान केलेला असेल.
चीनच्या स्थानिक वेळेनुसार रात्री १० च्या सुमारास एअर इंडियाचे हे विमान वुहानहून विद्यार्थ्यांना घेऊन भारताकडे रवाना होईल. शनिवारी रात्री दोन वाजेपर्यंत हे विमान भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. वुहान-दिल्ली हा प्रवास तसा ४५ मिनिटांचा आहे.
एअर इंडिया पुन्हा एकदा मदतीसाठी सज्ज आहे. यावेळी वुहानमधून भारतीयांची सुटका करणार आहे. जम्बो ७४७ ने आजपासून या मिशनला सुरुवात होत आहे. जय हिंद असे टि्वट एअर इंडियाचे चेअरमन अश्वनी लोहानी यांनी केले आहे.
WHO कडून जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित
कोरोना विषाणूचा वेगाने फैलाव होत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. चीनमध्ये आतापर्यंत १० हजार जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून, २१३ जणांचा मृत्यू झाला आहे.
जागितक आरोग्य संघटनेला कमकुवत आरोग्य व्यवस्था असलेल्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची चिंता सतावत आहे. कोरोना विषाणूचा फैलाव चीनमधून झाला आहे. त्यामुळे चीनमध्ये या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. भारतामध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूचा फक्त एक रुग्ण आढळला आहे