https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/punishing-signal_202001363398.jpg
आवाज खाली! मुंबईकरांनो, आता सिग्नलवर मोठ्यानं हॉर्न वाजवाल, तर याद राखा

आवाज खाली! मुंबईकरांनो, आता सिग्नलवर मोठ्यानं हॉर्न वाजवाल, तर याद राखा

सिग्नवरील ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई पोलिसांची भन्नाट संकल्पना

by

मुंबई: वाहतूक कोंडीत अडकल्यावर मनस्तापाला सामोरं जावं लागतं. त्यात आसपास असणारे वाहन चालक हॉर्न वाजवू लागल्यावर मनस्ताप आणखी वाढतो. याशिवाय ध्वनी प्रदूषणामुळे इतर समस्यादेखील निर्माण होतात. यावर आता मुंबई पोलिसांनी भन्नाट तोडगा शोधून काढला आहे. यामुळे सिग्नलवर विनाकारण हॉर्न वाजवणं थांबेल, अशी अपेक्षा आहे.

मुंबई पोलिसांनी सिग्नल परिसरात आवाज मोजणारी यंत्रणा लावली आहे. याबद्दलचा एक व्हिडीओ मुंबई पोलिसांनी ट्विट केला आहे. यामध्ये सिग्नल परिसरात असणाऱ्या दुभाजकावर असणारी यंत्रणा हॉर्नच्या आवाजाची तीव्रता मोजताना दिसत आहे. वाहन चालकांकडून वाजवण्यात येणाऱ्या हॉर्नची तीव्रता ८५ डेसिबलपेक्षा जास्त असल्यास सिग्नल रिसेट होतो. त्यामुळे वाहन चालकांना जास्त वेळ सिग्नलवर जास्त वेळ थांबावं लागतं. सिग्नलवर मोठमोठ्यानं हॉर्न वाजवण्यापेक्षा संयम ठेवून सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहणं, हे वाहन चालकांना शिकवण्यासाठी पोलिसांनी हा प्रयोग केला आहे.

मोठमोठ्यानं हॉर्न वाजवल्यास सिग्नल लवकर हिरवा होता, असं काहींना वाटतं. त्यामुळे ही मंडळी लाल सिग्नल दिसताच जोरजोरात हॉर्न वाजवतात. मात्र आता त्याचा नेमका उलट परिणाम सिग्नलवर दिसेल, असं मुंबई पोलिसांनी व्हिडीओतून म्हटलं आहे. आवाजाची तीव्रता मोजून सिग्नल रिसेट करणाऱ्या या यंत्रणेला पोलिसांनी 'शिक्षा देणारा सिग्नल' असं नाव दिलं आहे. सध्या सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, पेडर रोड, हिंदमाता आणि वांद्रे परिसरात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. 

सिग्नल परिसरात असणारी ही यंत्रणा थेट सिग्नलशी जोडलेली आहे. सिग्नल लाल झाल्यावर ही यंत्रणा वाहन चालकांकडून वाजवला जाणारा हॉर्न मोजते. या आवाजाची तीव्रता सिग्नलजवळ असणाऱ्या डिस्प्लेवर दिसते. हॉर्नच्या आवाजानं ८५ डेसिबलची मर्यादा ओलांडल्यावर सिग्नल रिसेट होतो. (उदाहरणार्थ- एखादा सिग्नल ९० सेकंद लाल राहत असेल आणि तो हिरवा होण्यास २५ सेकंदांचा अवधी शिल्लक असताना हॉर्नच्या आवाजानं ८५ डेसिबलची पातळी ओलांडल्यास तो पुन्हा ९० सेकंदांपासून काऊंटडाऊन सुरू करेल.) त्यामुळे सिग्नलवर जास्त वेळ थांबावं लागेल.