https://images.loksatta.com/2020/01/indigo-1.jpg?w=830
(सांकेतिक छायाचित्र)

माझ्याशी चर्चा न करता कुणाल कामरावर कारवाई का?, पायलटचं इंडिगोला पत्र

"हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये वेगळे नियम असतात असं मी समजावं का?"

by

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या समर्थनासाठी आता त्याच विमानाचे मुख्य वैमानिक पुढे आले आहेत ज्या विमानातून पत्रकार अर्णब गोस्वामी आणि कुणाल कामरा हे प्रवास करत होते. इंडिगोच्या वैमानिकाने पत्र लिहून कुणाल कामरावर झालेली कारवाई चुकीचं असल्याचं म्हटलंय. “माझ्या कंपनीने केवळ सोशल मीडिया पोस्ट्सच्या आधारे कारवाई केली आणि माझ्याशी काहीच चर्चा केली नाही यामुळे आपण ‘निराश’ झालो. माझ्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत असे कधी झाले नव्हते”, अशा आशयाचं पत्र लिहिलं आहे. हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये वेगळे नियम असतात असं मी समजावं का? अशी विचारणाही पत्रामध्ये केली आहे.

“कुणाल कामरा यांचे अर्णब गोस्वामी यांच्यासोबतचे वागणे चुकीचे होते, मात्र कारवाई करावी इतके त्यांनी काही केले नव्हते. त्यांनी विमानातील कर्मचाऱ्यांना एकदाही उलट उत्तर दिले नाही, सर्व सूचनांचेही योग्य पालन केले. सुरक्षिततेला कुठलाही धोका उत्पन्न केला नाही, किंवा कुठल्याही सूचनांचे उल्लंघन केले नाही. कामरा यांची वर्तणूक रुचिहीन असली, तरी पहिल्या स्तराच्या (लेव्हल १) बेलगाम प्रवाशाच्या व्याख्येत बसणारी नव्हती. त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत माझी आणि सर्व कर्मचाऱ्यांची माफीही मागितली. अशाप्रकारच्या किंवा याहून वाईट अनेक घटना आम्ही वैमानिकांनी आधी पाहिल्या आहेत. त्यावेळी कधी कारवाई झाली नाही”, असेही पायलटने आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. दरम्यान, पायलटच्या पत्राची इंडिगोने दखल घेतली असून अंतर्गत समितीने या घटनेची चौकशी सुरू केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट आणि गोएअर एअरलाइन्सने पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी कुणाल कामरावर बंदी घातली आहे. उड्डयन मंत्री हरदीप सिंह यांनी या घटनेची दखल घेताना विमानकंपन्यांना कारवाई करण्याचा सल्ला दिला होता.

मुंबईहून लखनौला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 5317 या विमानाने कॉमेडियन कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी प्रवास करत होते. कुणाल कामराने या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण केलं आणि सोशल मीडियावर पोस्ट केलं. व्हिडिओत कुणाल कामरा हा गोस्वामी यांच्या पत्रकारितेवर टीका करताना “गोस्वामी भित्रट आहे असं म्हणताना दिसतोय. त्यासोबत कुणालने निवेदनही जारी केलं आहे. त्यामध्ये मला काहीही पश्चात्ताप नाही आणि मी माफी मागणार नाही असं त्याने स्पष्ट केलंय. आपल्या निवेदनात त्याने, “मी आज लखनौला जाणाऱ्या विमानात अर्णब गोस्वामी यांना भेटलो. त्यांना बोलण्याची मी विनंती केली पण त्यांनी फोनवर बोलत असल्याचं भासवलं आणि मी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे ते म्हणाले. त्यावेळी सीटबेल्टचा संकेत बंद होता. नंतर सीटबेल्ट लावण्यास सांगण्यात आलं आणि एअरलाईन कर्मचाऱ्याने मला जागेवर जाण्यास सांगितलं. त्यानंतर टेक ऑफ झाल्यावर मी पुन्हा त्यांच्याकडे गेलो आणि बोलण्याची विनंती केली. पण आपण काहीतरी पाहत असल्याचं सांगत त्यांनी मला टाळलं. मी वारंवार विनंती केली. नंतर मला त्यांच्या पत्रकारितेबद्दल काय वाटतं याबद्दल एक स्वगत सादर केलं. माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. ‘रिपब्लिक टीव्ही’चे लोक प्रेक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबर जे करतात तेच मी केलं. आत्महत्या केलेल्या रोहित वेमुल्लासाठी आणि त्याच्या आईसाठी मी हे करतोय. त्याच्या जातीबाबत तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये चर्चा करत होतात. मी हे करतोय, मला त्याबद्दल काहीही पश्चात्ताप नाही आणि मी माफी मागणार नाही. असं कामराने एका निवेदनात म्हटलं. यानंतर केलेल्या ट्विटमध्ये हे सर्व मी माझ्या हिरोसाठी केलं आहे. रोहित वेमुल्लासाठी केलं आहे, असं कुणालने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. मी वैयक्तिकरित्या सर्व क्रू मेंबर्सची माफी मागितली. मला नाही वाटत मी कोणताही गुन्हा केला आहे. मी हे सर्व रोहित वेमुल्लासाठी केलं. मी एक व्यक्ती सोडून सर्वाची माफी मागितली,”असंही त्यानं नमूद केलं.