https://images.loksatta.com/2020/01/Khashaba-Jadhav-Son.jpg?w=830

एकता कपूरला पद्मश्री मिळतो, मग बाबांना का नाही? खाशाबा जाधवांच्या मुलाचा उद्वीग्न सवाल

सरकारदरबारी होत असलेल्या उपेक्षेबद्दल व्यक्त केली खंत

by

केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या पद्म-पुरस्कारांच्या यादीवर आता नाराजीचे सूर उमटायला सुरुवात झालेली आहे. काही दिवसांपूर्वी महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने आपलं नाव वगळलं गेल्यामुळे, या पुरस्कारांचा निकष काय असतो असा सवाल विचारत आपली नाराजी व्यक्त केली होती. यानंतर, भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या मुलानेही, खाशाबांच्या बाबतीत होत असलेल्या उपेक्षेबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. ते पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.

गेली १९ वर्ष मी माझ्या वडिलांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करतो आहे. किमान त्यांच्या कार्याला मरणोत्तर पद्म-पुरस्काराने गौरवण्यात यावं. बाबांच्या निधनानंतर तब्बल १७ वर्षांनी त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं. एकता कपूरला यंदा पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. तिने नेमकं असं कोणतं सामाजिक काम केलं ज्यामुळे तिला हा मानाचा पुरस्कार देण्यात आला?? रणजीत जाधव यांनी आपली खंत व्यक्त केली.

१९५२ साली हेलसिन्की ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत भारतासाठी पहिलं वैयक्तिक पदक मिळवलं. या कामगिरीनंतर भारताला कुस्तीत पहिलं पदक मिळवण्यासाठी तब्बल ४४ वर्षांची वाट पहावी लागली. १९८४ साली खाशाबा जाधव यांचं निधन झालं. यानंतरही तब्बल १७ वर्षांनी त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं. सरकारदरबारी होत असलेल्या उपेक्षेबद्दल रणजीत जाधव यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.

१९५२ साली बाबांनी ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक जिंकलं. तुम्ही १९५४ ते १९८४ सालची पुरस्कार यादी पाहिलीत, तर अनेक क्रीडापटूंना पद्मश्री मिळाला आहे. काही जणांना पद्म-भूषण, तर काही जणांना तिन्ही मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. मात्र ध्यानचंद यांचा अपवाद वगळता एकही ऑलिम्पियन या यादीत नाहीये. महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेत अनेकदा खाशाबा जाधव यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याची मागणी केली, मात्र केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही रणजीत यांनी केला.