https://images.loksatta.com/2019/12/khadse-pawar.jpg?w=830

दिल्लीत एकनाथ खडसे आणि शरद पवारांमध्ये अर्धा तास चर्चा

एकनाथ खडसे भाजपामध्ये नाराज असून वेळोवेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

by

भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी सोमवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या ६ जनपथ निवासस्थानी दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. दोघांमध्ये नेमकी कार्य चर्चा झाली ते समजू शकलेले नाही.  एबीपी माझा वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. एकनाथ खडसे भाजपामध्ये नाराज असून वेळोवेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. एकनाथ खडसे हे भाजपा नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत आल्याची चर्चा होती. पण त्याऐवजी ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले.

मागच्या आठवड्यात खडसे यांनी भाजपाच्या राज्य नेतृत्वावर टीका केली होती. “ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे पराभूत झाले. भाजपात दुर्दैवाने बहुजन समाजाला डावलण्याचा होतोय,” असा आरोप त्यांनी केला होता. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला आहे. कोणी पक्षविरोधात काम केले त्यांची नावांसहित आपण वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. पक्षाकडून आता काय कारवाई होते त्याची प्रतिक्षा आहे असे एकनाथ खडसे म्हणाले होते.

मला पक्षाच्या सुकाणू समितीवरून काढण्यात आले. जाणीवपूर्वक पक्षातून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही मी यांची आरती करावी काय? माझा पक्ष सोडण्याचा अद्यापही विचार नाही. परंतु वारंवार असाच अन्याय होत राहिल्यास मला पक्षाबाबत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा भाजप नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

पक्ष उभारणीसाठी मी मेहनत घेतली. परंतु त्याच पक्षाने मला फळ काय दिले? मला पक्षात बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगवेगळ्या चौकशीचे आदेश दिले, कोणतेही कारण नसताना पक्षाने माझ्यावर कारवाई का केली? मात्र अशी कारवाई माझ्यावरच नव्हे तर अगोदर गोपीनाथ मुंडे यांच्यावरही करण्यात आली होती. मला स्पर्धेतून बाहेर करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षातील अशा लोकांची मी आरती करावी काय, असा प्रश्न त्यांनी विचारला होता.