जोवर माणसांना एकमेकांशी बोलायची गरज वाटते तोवर रंगभूमी अमर आहे
' नसीर अत्यंत प्रामाणिक. विद्यार्थी, नवोदित कलाकार ते अभिनेत्री असा प्रवास मी त्याच्याबरोबर केला आहे. आपल्याला अभिरुची असलेल्या प्रत्येक गोष्टीचा शोध त्याने अधाशासारखा घेतला आहे'. Theater culture is not dead until people need to talk to each other:
by ऑनलाइन लोकमतपुणे :जोवर माणसांना एकमेकांशी बोलायची गरज वाटते तोवर रंगभूमी अमर आहे ,असे मत ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी नसरुद्दीन शाह यांनी व्यक्त केले. पुण्यात त्यांना तन्वीर सन्मान प्रदान करण्यात आला तेव्हा ते बोलत होते.
पुण्यात रूपवेध प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा तन्वीर सन्मान ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ दिग्दर्शक गोंविद निहलानी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. पुण्यात प्रायोगिक रंगभूमी रूजविणाऱ्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरला 'तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार' देण्यात आला.याप्रसंगी किरण यज्ञोपवित, शुभांगी दामले, प्रमोद काळे, रत्ना पाठक शाह, दीपा लागू आदी मान्यवर उपस्थित होते. आगामी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अभिनेते बेंजामिन गिलानी यांनाही गौरवण्यात आले.
पुढे ते म्हणाले की, पन्नास वर्षांपासून ऐकतो आहे, की रंगभूमी मरत आहे. तिच्या जीवाला धोका आहे, तिला नव्या श्वासाची गरज आहे वगैरे, मात्र मला तसं अजिबात वाटतं नाही. काही लोक ज्यांना रंगभूमीवर कोणत्याही हेतूशिवाय प्रेम करतात तोवर रंगभूमीला मरण नाही. लोकांना एकमेकांशी बोलायची गरज वाटते तो रंगभूमी अमर आहे, असाही उल्लेख त्यांनी केला. मी इतकी वर्षे थिएटर करू शकलो, कारण माझे रंगभूमीवर निस्सीम प्रेम आहे. तू श्रीमंत हो, असे आशीर्वाद आईने कधीच दिले नाहीत. तुला प्रतिष्ठा मिळावी, हीच तिची कायम इच्छा असायची. कारण, आदर थेट ह्रदयात घर करतो.
रत्ना पाठक शाह म्हणाल्या की, ' नसीर अत्यंत प्रामाणिक. विद्यार्थी, नवोदित कलाकार ते अभिनेत्री असा प्रवास मी त्याच्याबरोबर केला आहे. आपल्याला अभिरुची असलेल्या प्रत्येक गोष्टीचा शोध त्याने अधाशासारखा घेतला आहे. प्रत्येक नाटकाचा तो आजवर नव्या दृष्टीने विचार करत आला आहे. ज्ञानपिपासू वृत्ती त्याच्या ठायी आहे. प्रामाणिकपणे सत्याचा शोध घेण्याची कास त्याने कधीच सोडली नाही. अधिकाधिक चांगल्याचा शोध घ्यावा, स्वतःमध्ये कायम बदल करावेत आणि स्वतःशी आणि प्रेक्षकांशी प्रामाणिक रहावे हीच वृत्ती त्याने आजवर जोपासली आहे.
गोविंद निहलानी म्हणाले, 'नसीर यांना लवकर राग येतो, चुकीच्या गोष्टी पटत नाहीत आणि ते स्पष्टपणे बोलून दाखवतात. अभिनेता चांगला असला तरी रागीट आहे, असे आधीपासून ऐकले होते. एकत्र काम करायला सुरुवात केल्यावर लक्षात आले की, जे ऐकले ते खरे होते. त्यांच्या कलाकलाने घ्यायला सुरुवात केली. संवाद पाठांतर असो की आवराआवरी, ते सर्वांच्या आधी तयार असायचे. मग इतर कलाकारांकडून तालीम करून घेऊन मग त्यांना बोलवायचो. हळूहळू त्यांचा रागीट स्वभाव सौम्य होत गेला'..