सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांना १ किलो कांदा भेट
पुदुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी दर वाढीचा नोंदवला आगळावेगळा निषेध
by लोकसत्ता ऑनलाइनकाँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज वाढदिवस असुन, पुदुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी तो वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना १ किलो कांद्या भेट दिला आहे. याद्वारे त्यांनी सध्या सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या कांद्याच्या दरावरून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे.
देशात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याच्या दरवाढीवरून संसदेसह देशभरात गदारोळ सुरू आहे. या मुद्यावरून काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील, कांद्याच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर दर नियंत्रणात आणण्यासाठी तुर्कीतून कांद्याची आयात करण्यात आली आहे. केंद्र सरकार ही चूक करत आहेत,” असा सूचक सल्लाही दिला होता. पवारांनी कांद्याच्या दरवाढीच्या कारणांचाही उलगडा केला होता.
तीन ते चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला. पण, केंद्र सरकारने त्यावेळी चांगला भाव कांद्याला दिला नाही. यामुळे पुढच्या हंगामात कांदा उत्पादक शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळला. आता आपल्याला तुर्कीतून कांदा आयात करावा लागत आहे आणि कांदा आयात करून केंद्र सरकारने नक्कीच चूक केली आहे. या सगळ्यांविषयी मी तीन महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. त्यात हे असं घडेल असा इशारा दिला होता,” असं पवार यांनी म्हटलं होतं.