https://images.loksatta.com/2019/12/Waheeda.jpg?w=830

“बलात्काऱ्यांविरोधात खटला चालवून लोकांचे पैसे कशाला वाया घालवायचे?”, वहीदा रहमान यांचा सवाल

"बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात माफी नसावी"

by

हैदराबामधील महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावर ज्येष्ठ अभिनेत्री वहीद रहमान यांनी संताप व्यक्त केला असून बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात माफी नसावी असं मत व्यक्त केलं आहे. मात्र यावेळी त्यांनी आरोपींना मृत्यूची नाही तर जन्मठेपेची शिक्षा दिली जावी असंही सांगितलं आहे. ६ डिसेंबर रोजी बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना हैदराबाद पोलिसांनी चकमकीत ठार केलं.

पोलिसांनी तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेलं असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं आहे. पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून काहीजण पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत तर काहीजण विरोध दर्शवत आहेत.

वहीदा रहमान यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “बलात्कारासारखा गुन्हा माफीच्या लायक नाही. पण तरीही मला वाटतं, एखाद्याची हत्या करण्याचा अधिकार आपल्याला नाही. बलात्काऱ्याला मरेपर्यंत जन्मठेप दिली आहे. आयुष्यभर त्यांना कारागृहात डांबून ठेवलं पाहिजे”.

जर आरोपींना रंगेहात पकडण्यात आलं असले तर कोणताही खटला चालवण्याची गरज नाही असंही यावेळी त्यांनी म्हटलं. “जर तुम्हाला रंगेहात पकडलं असेल तर खटल्याची गरजच काय ? तुम्ही जनतेचा पैसा वाया घालवत आहात,” असं मत वहीदा रहमान यांनी व्यक्त केलं.

हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती. आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे केले होते. आरोपींना तपासासाठी घटनास्थळी नेण्यात आलं होतं. यावेळी आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. चौघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं.

स्कुटी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घेऊन गेले होते
२७ नोव्हेंबरच्या संध्याकाळी चारही आरोपींनी पीडित तरुणी टोल प्लाजावर स्कुटी उभी करत असल्याचं पाहिलं होतं. यानंतर आरोपींनी सामूहिक बलात्काराचा कट रचला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपली स्कुटी घेण्यासाठी परतली असता पंक्चर झालं असल्याचं तिने पाहिलं. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपींनीच तरुणीच्या स्कुटीमधील हवा काढली होती. पीडित तरुणी पंक्चर झाल्यामुळे चिंतेत होती. यावेळी एक आरोपी मदत करण्याचा बहाणा करत तिथे पोहोचला. त्याचा हेल्पर स्कुटी दुरुस्त करुन देतो सांगत काही दूर घेऊन गेला. यानंतर पीडित तरुणीवर जबरदस्ती करत निर्जनस्थळी नेण्यात आलं. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता.