वरात उशिरा पोहोचली, नवरीमुलीने दुसऱ्या मुलासोबत केलं लग्न
स्वत:च्या लग्नाला उशिरा पोहोचणे एका नवरदेवाला चांगलेच महाग पडले आहे.
by लोकसत्ता ऑनलाइनस्वत:च्या लग्नाला उशिरा पोहोचणे एका नवरदेवाला चांगलेच महाग पडले आहे. लग्नाच्या मांडवात नवरदेव उशिरा पोहोचल्यामुळे चिडलेल्या वधूने लग्न करण्यास नकार दिला. उत्तर प्रदेशच्या नानगालजाट गावात मागच्या आठवडयात ही घटना घडली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. वरात उशिराने पोहोचल्यामुळे चिडलेल्या वधून नवरदेवासोबत विवाहाच्या बोहल्यावर चढण्यास नकार दिला. त्याऐवजी तिने गावातील दुसऱ्या मुलाबरोबर लग्न केले.
मुलीने ज्या मुलाबरोबर लग्न मोडले त्याच्याबरोबर तिचे सामूहिक विवाहसोहळयात लग्न झाले होते. ते चार डिसेंबरला पुन्हा विधिवत लग्न करणार होते. नवरदेव धामपूर येथे राहतो. त्याने दुपारी दोनवाजेपर्यंत वरात घेऊन वधुच्या गावी पोहोचणे अपेक्षित होते. पण वरपक्ष रात्री उशिराने पोहोचला. हुंडयावरुन आधीच दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरु होते. त्यामुळे वधूपक्षाच्या मनामध्ये आधीपासूनच राग धुमसत होता.
वधूपक्षावर नवरदेव आणि त्यांच्या कुटुंबियांना कैद करुन ठेवल्याचा तसेच त्यांच्या महागडया वस्तू काढून घेऊन त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. वरपक्षाच्या सुटकेसाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये तडजोड झाली.
नवरीमुलीला लग्न करायचे नव्हते. त्यामुळे ज्येष्ठांच्या संमतीने शनिवारी दोघांमध्ये घटस्फोट झाला. नवरदेव आपल्या नातेवाईकांसोबत त्याच्या गावी निघून गेला. नवरीमुलीने गावातीलच दुसऱ्या मुलाबरोबर लग्न केले. पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूकडून तक्रार नोंदवण्यात आली नाही.