https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/arrest-6000_201906256264.jpeg
तरुणीवर बळजबरी करणाऱ्यास पोलिसांनी घातल्या बेड्या 

तरुणीवर बळजबरी करणाऱ्यास पोलिसांनी घातल्या बेड्या 

तरुणीवर बळजबरी करणाऱ्या युवकाला पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली.

by

ठळक मुद्दे

देसाईगंज (गडचिरोली) - एकांतवासाचा फायदा घेत एका तरुणीवर बळजबरी करणाऱ्या युवकाला पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली. पीडित तरुणी एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. दरम्यान, उशिरा झाल्यामुळे आरोपीला मंगळवारी न्यायालयात उभे करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी राजेश सुरेश कांबळी रा.कोंढाळा हा रविवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास देसाईगंजवरून आपल्या गावाकडे दुचाकीने निघाला होता. पीडित तरुणीलाही तिकडेच जायचे असल्यामुळे आणि तरुण ओळखीचा असल्यामुळे तिने त्याला लिफ्ट मागितली. पण आरोपी राजेश याने तिला कोंढाळ्याऐवजी शिवराजपूर रस्त्यावरील राईस मिलजवळ नेले आणि अंधाराचा व तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्याशी बळजबरी केली.

पीडित तरुणीने हा प्रकार तिथे असलेल्या राईस मिलमधील लोकांना सांगितली. त्यांनी या घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर सदर तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी युवकाविरूद्ध भादंवि कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर तरुणीला जीवे मारण्याचा कोणताही प्रयत्न झाला नसून तशी तक्रारही नसल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सारिका गुरूकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सोमवारी सायंकाळी आरोपी राजेश कांबळी याला अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गुरूकर तपास करीत आहे.

महिलांना लवकर सुट्टी द्या
गडचिरोली, देसाईगंजसह अनेक तालुका ठिकाणातील प्रतिष्ठानांमध्ये ग्रामीण भागातील महिला, मुली काम करतात. सायंकाळी त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी पुरेशी साधने नसतात. त्यामुळे अशा सर्व मुली व महिलांना दुकानदारांनी संध्याकाळी लवकर सुट्टी देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी स्त्री शक्ती संघटनेच्या छाया कुंभारे, अश्विनी भांडेकर यांनी केली आहे.