कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूकीच्या निकालानंतर मोदींचे काँग्रेस-जेडीएसवर शरसंधान
जनादेश आम्हाला मान्य -काँग्रेस
by लोकसत्ता ऑनलाइनकर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. सहा जागांवर भाजपानं विजय मिळवला असून, सहा जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. कर्नाटकातील पोटनिवडणुकीचे निकाल आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि जेडीएसवर शरसंधान साधले आहे.
जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना काँग्रेस आणि जेडीएसमधील १७ आमदारांनी बंडखोरी शस्त्र उपसले होते. बंडखोरीमुळे कुमारस्वामी यांचे सरकार जुलै महिन्यात कोसळले. त्यानंतर कर्नाटकात मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं सरकार स्थापन केलं. २२४ सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेच संख्याबळ १७ आमदारांच्या बडतर्फीनंतर २०८ वर आले होते. त्यानंतर येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. सध्या भाजपाचे १०५ आमदार असून, सत्तेवर विराजमान राहण्यासाठी त्यांना ६ आमदारांचं संख्याबळ आवश्यक होत. पण, भाजपानं निकालात जोरदार मुंसडी मारली आहे. सहा उमेदवार विजयी झाले असून, सहा उमेदवार आघाडीवर आहेत.
कर्नाटक पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि जेडीएसवर टीका केली आहे. झारखंडमधील हजारीबाग येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले, “काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षानं जनदेशाची चोरी करून पाठीत खंजीर खुपसला. पण, कर्नाटकातील जनतेने लोकशाही पद्धतीनं त्यांना शिक्षा देत चांगला धडा शिकवला आहे. कर्नाटकच्या जनतेने आघाड्याच्या नव्हे तर एका मजबूत आणि स्थिर सरकारला बळ दिलं आहे,” असं मोदी म्हणाले.
कर्नाटकाचे पोटनिवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी जनदेश मान्य असल्याचं म्हटलं आहे. “या १५ मतदारसंघातील मतदारांनी दिलेला जनादेश आम्हाला मान्य आहे. लोकांनी दलबदलूंना स्वीकारले आहे. त्यामुळे आम्ही पराभव स्वीकारला आहे. या पराभवामुळे आम्ही निराश होणार नाही,” असं शिवकुमार म्हणाले.