https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/dfmnew_201912336208.jpg
फडणवीसांनी मोदींची ‘री’ ओढली, देवेंद्रांचा शिवसेनेला सूचक इशारा

फडणवीसांनी मोदींची ‘री’ ओढली, देवेंद्रांचा शिवसेनेला सूचक इशारा

राज्यात शिवसेनेनं भाजपापासून वेगळी चूल मांडत महाविकास आघाडी स्थापन केली.

by

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला टोला लगावला आहे. कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीतील निकालाचा दाखला देत फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तत्पूर्वी मोदींनी आपल्या भाषणात बोलताना, जनतेचा कौल नाकारुन मागच्या दरवाजाने सरकार स्थापन करणाऱ्यांना लोकांनी धडा शिकविला. लोकशाही पद्धतीने जनतेने त्यांचे कटकारस्थान उद्ध्वस्त केले, असे मोदींनी म्हटले होते. त्यानंतर फडणवीसांनीही मोदींची री ओढली. 

राज्यात शिवसेनेनं भाजपापासून वेगळी चूल मांडत महाविकास आघाडी स्थापन केली. मुख्यमंत्री पदावरुन झालेल्या वादामुळे शिवसेना आणि भाजपाचा काडीमोड झाला. त्यामुळे, जनादेश असूनही भाजपाला विरोधी बाकावर बसावे लागले. त्यावरुन, फडणवीसांनी शिवसेनेला लक्ष्य केलंय. कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या आज लागलेल्या निकालावरुन फडणवीसांनी सेनेवर टीका केली. ‘जनतेने नाकारलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येतात, जनादेशाचा अपमान करून संधीसाधू राजकारण करतात, त्यानंतर पहिली संधी मिळताच जनता त्यांना कसा धडा शिकविते, याचे उदाहरण आज कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिले आहे. जनादेश आणि जनतेच्या इच्छेविरोधात जाण्याचे परिणाम कर्नाटक निकालांनी दाखवून दिले आहेत, असे फडणवीस यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा आणि कर्नाटक तसेच देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, असेही फडणवीस यांनी म्हटलंय.  

दरम्यान, झारखंडमधील बरही याठिकाणी प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, दक्षिण भारतात भाजपा कमकुवत आहे असं बोललं जात होतं. पण कर्नाटकात आलेल्या पोटनिवडणुकीच्या निकालाने त्याला उत्तर मिळालं. जनतेचा कौल नाकारुन मागच्या दरवाजाने सरकार स्थापन करणाऱ्यांना लोकांनी धडा शिकविला. लोकशाही पद्धतीने जनतेने त्यांचे कटकारस्थान उद्ध्वस्त केले. पोटनिवडणुकीत भाजपा सरकार राहणार की जाणार असा प्रश्न केला जात होता. त्याला जनतेने उत्तर दिले आहे, असं त्यांनी सांगितले. कर्नाटकात जनतेच्या जनादेशाचा विजय झाला आहे. काँग्रेस आता लोकांची विश्वासघात करु शकणार नाही. हा संदेश संपूर्ण देशात गेला असेल की जर कोणी जनतेच्या पाठित खजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तर संधी मिळताच जनता त्यांना शिक्षा देते. जनतेने भाजपाला नवी ताकद दिली आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानत शिवसेनेवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.