https://images.loksatta.com/2019/12/pant-virat.jpg?w=830

Video : झेल पंतने सोडला, पण कोहली प्रेक्षकांवरच भडकला…

पंतने डावाच्या अगदी सुरुवातीलाच लुईसला जीवदान दिलं..

by

विंडीजने धडाकेबाज लेंडल सिमन्स याच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर दुसऱ्या टी २० सामन्यात भारतावर मात केली. विजयासाठी दिलेलं १७१ धावांचं आव्हान विंडीजने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत विंडीजच्या फलंदाजांनी तिरुअनंतपुरमच्या मैदानावर फटकेबाजी केली. ८ गडी राखून मिळवलेल्या या विजयासह वेस्ट इंडीजने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.

वेस्ट इंडीजच्या फलंदाजांची फटकेबाजी आणि भारताचे खराब क्षेत्ररक्षण यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला. भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर इव्हिन लुईसने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पंतकडे गेला पण पंतकडून झेल सुटला.

खेळाडूंनी जल्लोष केल्यानंतर त्यांना कळले की पंतने झेल सोडला. हा झेल सोडल्यानंतर चाहत्यांनी पुन्हा एकदा मैदानात धोनीचा जयघोष सुरू केला होता. पण सीमेवर उभा असलेला विराट कोहली चाहत्यांवर चांगलाच चिडलेला दिसला. त्याने इशारा करत साऱ्यांना गप्प राहण्यास आणि पंतला पाठिंबा देण्यास सांगितले.

दरम्यान, सिमन्स आणि एविन लुईस यांनी विंडीजला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये ७३ धावांची भागीदारी झाली. विंडीजचा स्वैर मारा आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण यामुळे भारतीय संघाने काही चांगल्या संधी दवडल्या. याचा फायदा घेत विंडीजच्या फलंदाजांनी मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. एविन लुईस आणि शिमरॉन हेटमायर यांना माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. मात्र सिमन्सवर अंकुश लावण्यात त्यांना अपयश आलं. सिमन्सने या सामन्यात नाबाद ६७ धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जाडेजाने १-१ बळी घेतला.

त्याआधी, भारतीय संघाला १७० धावांवर रोखण्यात विंडीजचे गोलंदाज यशस्वी झाले. नाणेफेक जिंकत विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय विंडीजच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. शिवम दुबेचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज त्यांच्या लौकिकाला साजेशी खेळी करु शकला नाही. सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, जाडेजा हे फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शिवम दुबेने आपलं टी-२० क्रिकेटमधलं पहिलं अर्धशतक ठोकत महत्वपूर्ण भागीदारी रचली आणि भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. विंडीजकडून हेडन वॉल्श आणि केजरिक विल्यम्स यांनी प्रत्येकी २-२ तर पेरी, शेल्डन कॉट्रेल आणि जेसन होल्डरने १-१ बळी घेतला.