https://images.loksatta.com/2019/12/Les.jpg?w=830
सनदास मलिक आणि अंजली चक्रा

हिंदू-मुस्लिम लेस्बियन जोडप्याचा ‘तो’ व्हिडिओ टीकटॉकने काढून टाकला आणि…

पाकिस्तानची सनदास मलिक आणि भारताची अंजली चक्रा या दोघी अनेक वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत

by

काही महिन्यांपूर्वी अमेरिकेमधील एक समलैंगिक जोडपं चांगलचं चर्चेत आलं होतं. त्यामागील कारण होतं त्यांनी केलेलं एक फोटोशूट. या जोडप्यातील एक मुलगी मुसलीम तर एक हिंदू आहे. आता हेच जोडपं पुन्हा चर्चेत आलं आहे. या चर्चेमागील कारण आहे त्यांनी टीकटॉकवर पोस्ट केलेला एक व्हिडिओ

पाकिस्तानची सनदास मलिक आणि भारताची अंजली चक्रा या दोघी मागील काही वर्षांपासून एकमेकींना डेट करत आहेत. त्या अनेकदा सोशल मिडियावरुन आपले फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. नुकताच त्यांनी टीकटॉक या अॅपवर आपला एक व्हिडिओ पोस्ट केला. मात्र अंजलीने दिलेल्या माहितीनुसार टीकटॉकने हा व्हिडिओ काढून टाकला. हा व्हिडिओ आमच्या नियमांचे उल्लंघन करणार आहे असं सांगत तो काढून टाकण्यात आला आहे असं टीकटॉकचं म्हणणं असल्याचं अंजली सांगते.

टीकटॉकने व्हिडिओ काढून टाकल्यानंतर अंजलीनेच हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी ट्विटरवर पोस्ट केला. हा व्हिडिओ पोस्ट करताना तीने टीकटॉकवर टीका केली आहे. “हा व्हिडिओ नियमांचे उल्लंघन करणारा व्हिडिओ आहे असं सांगत टीकटॉकने डिलीट केला आहे. त्यामुळेच समलैंगिकतेबद्दल असणाऱ्या भितीबद्दलच्या अफवा खऱ्या आहेत असंच यातून स्पष्ट होतयं.” असं तिने म्हटलं आहे. तिने यामध्ये टीटटॉकलाही टॅग केलं आहे. “टीकटॉक तुम्ही हा व्हिडिओ का काढून टाकलात याबद्दल स्पष्टीकरण द्याल का?,” असा सवाल तिने विचारला आहे.

या व्हिडिओमध्ये अंजली आणि सनदास दोघीही आधी पजामा घालून नाचताना दिसतात आणि नंतर त्या पारंपारिक वेशात नाचताना दिसतात.

अंजलीने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवत टीकटॉकवर टीका केली. ‘हे चुकीचं आहे. असो हा त्यांचा तोटा आहे. मला तुमचे व्हिडिओ कायमच आवडतात. असेच व्हिडिओ शेअर करत रहा,’ असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने, ‘मी टीकटॉकचे नियम वाचले पण तुमचा व्हिडिओ कोणत्या नियमांचे उल्लंघन करत नाहीय,’ असं म्हटलं आहे.