https://images.loksatta.com/2019/12/New-Project-2-1.jpg?w=830

कार्तिक पडला अर्जुनवर भारी, बॉक्स ऑफिसवर ‘पती पत्नी और वो’ची दमदार कमाई

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटद्वारे चित्रपटांची कमाई सांगितली आहे

by

गेल्या शुक्रवारी बॉलिवूडमधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पती पत्नी और वो’ आणि ‘पानिपत’ प्रेक्षकांच्या भेटीला आले. पण अभिनेता कार्तिक आर्यनचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू करणार की अभिनेता अर्जुन कपूरचा तगडी स्टारकास्ट असलेला ऐतिहासीक चित्रपट ‘पानिपत’ जास्त कमाई करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण यावेळी कार्तिक आर्यनने बाजी मारल्याचे दृश्य दिसत आहे.

नुकताच चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे दोन्ही चित्रपटांची तीन दिवसांची बॉक्स ऑफिसवरील कमाई सांगितली आहे. ‘पती पत्नी और वो’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी ९.१० कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या कमाईमध्ये वाढ होत १२.३३ कोटींची कमाई केली आहे. तसेच रविवारी चित्रपटाने १४.५१ कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत चित्रपटाने ३५.९४ कोटींचा गल्ला जमावला आहे.

हा चित्रपट १९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने हे त्रिकूट पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत असल्याचे दिसत आहे.

पानिपत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी शुक्रवारी ४.१२ कोटींची, दुसऱ्या दिवशी ५.७८ रुपयांची कमाई केली असल्याचे तरण आदर्श यांनी सांगितले आहे. तर ‘पानिपत’च्या कमाईत पहिल्या दोन दिवसांपेक्षा रविवारी वाढ झाल्याचे अर्जुन कपूरने सांगितले आहे. रविवारी चित्रपटाने ७.५-८ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने एकूण १७.९ कोटी रुपयांची कमाई आहे.

‘पानिपत’च्या ऐतिहासिक लढाईवर आधारित ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले आहे. यामध्ये संजय दत्त, अर्जुन कपूर, क्रिती सनॉन यांची मुख्य भूमिका आहे.